अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आवाज उठवणाऱ्या दोन पत्रकारांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर


स्टॉकहोम – विविध क्षेत्रासाठी जगात अत्यंत प्रतिष्ठेचे समजल्या जाणार नोबेल पुरस्करांची घोषणा केली जात आहे. नोबेल शांतता पुरस्काराची आज शुक्रवारी घोषणा नोबेल समितीने केली. या पुरस्करासाठी फिलीपीन्सच्या मरिया रेस्सा आणि रशियाचे दिमित्री मुराटोव या दोन पत्रकारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्या लोकशाहीमधील अविभाज्य घटक असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या प्रयत्नांसाठी नोबेल शांतता पुरस्कार जाहीर केला जात असल्याचे नोबेल समितीने पुरस्कार जाहीर करताना नमूद केले आहे.

२०१२ पासून ऱॅपलर ( Rappler) या डिजीटल मिडिया कंपनीच्या माध्यमातून मरिया रेस्सा यांनी फिलीपीन्समध्ये तेथील शासन आणि प्रशासकीय व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवला. खास करुन देशाचे राष्ट्राध्यक्ष ड्युटेरटी यांच्या शासन काळात वादग्रस्त ठरलेली अँटी ड्रग्ज मोहिम आणि त्यामुळे दडपशाही या विरोधात आवाज उठवला. एवढी लोके सरकारच्या या मोहिमेत ठार मारली गेली की जणू स्वतःच्याच देशातील लोकांविरोधात युद्ध पुकारल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. मरिया रेस्सा यांनी या मोहिमेविरोधात सातत्याने लिखाण करत सत्य चव्हाट्यावर आणले.

तर रशियातील Novaja Gazeta या वृत्तपत्राच्या संस्थापकांपैकी दिमित्री मुराटोव हे एक आहेत. आत्ताच्या घडीला हे वृत्तपत्र रशियातील सर्वात स्वतंत्र बाण्याचे, सरकार विरोधात आवाज उठवणारे वर्तमानपत्र म्हणून ओळखले जाते. या वृत्तपत्राने १९९३ पासून भ्रष्ट्राचार, पोलिसांची दडपशाही, बेकायदेशारी अटक, सातत्याने निवडणुकीतील गैरप्रकार याबद्द्ल निर्भिडपणे वृत्तांकन केले. बदनामी आणि धमक्यांना भिक न घालता दिमित्री मुराटोव यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून काम चालू ठेवले असल्याचे पुरस्कराची घोषणा करताना नोबेल समितीने म्हटले आहे.