भारतीय लष्कराने तवांग प्रांतामधील चीनी सैनिकांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला


नवी दिल्ली – भारतीय लष्कराने अरुणाचल प्रदेशच्या तवांग भागामध्ये भारतीय सीमेत घुसखोरी करणाऱ्या चीनी सैनिकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. चीनी लष्करातील २०० सैनिकांनी तिबेटच्या सीमेजवळून भारतीय सीमेमध्ये घुसखोरी केली आणि या ठिकाणी सैनिक तैनात नसणाऱ्या बंकर्सची नासधूस केल्याची माहिती सरकारी सुत्रांनी न्यूज १८ या वृत्तवाहिनीला दिली आहे.

मागील आठवड्यामध्ये हा घुसखोरीचा प्रकार प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळच्या बूम ला आणि यांग्त्से प्रदेशामध्ये घडल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चिनी लष्कराच्या गस्त घालणाऱ्या पथकाने भारतीय सीमेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भारतानेही त्यांना चोख उत्तर देत चीनी तुकडीमधील काही सैनिकांना तात्पुरत्या स्वरुपात ताब्यात घेतले. हे प्रकरणनंतर स्थानिक लष्करी कमांडर्स स्तरावर सोडवण्यात आले आणि चीनी सैनिकांना सोडून देण्यात आले, असे सुत्रांनी स्पष्ट केले आहे.

लष्कराकडून या घटनाक्रमासंदर्भात कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. पण संरक्षणासंदर्भातील जबाबदारी असणाऱ्या सुरक्षा दलांच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये भारतीय संरक्षण दलांना नुकसान झाले नसल्याचे म्हटले आहे.

भारत आणि चीनमधील सीमांची ठोस निश्चिती करण्यात आलेली नाही. दोन्ही देशांकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंदर्भात वेगवेगळे दावे केले जातात. दोन्ही देशांमधील समझोते आणि इतर करारांनुसार या ठिकाणी शांतता ठेवण्याला प्राधान्य असलं तरी घुसखोरीबद्दल दोन्ही देशांमध्ये सीमा निश्चिती नसल्यामुळे मतमतांतरे असल्याचे सुत्रांनी म्हटले आहे. सध्या दोन्ही बाजूच्या सैन्यांकडून गस्त घातली जात आहे.

जेव्हा दोन्ही बाजूच्या गस्त घालणाऱ्या तुकड्या प्रत्यक्षात भेटतात, तेव्हा ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे ते वागतात, असे सुत्रांचे म्हणणे आहे. चीनने या प्रदेशामध्ये अशाप्रकारे घुसखोरी करणे काही नवीन नाही. २०१६ साली २०० हून अधिक चीनी सैनिक भारतीय सीमेमध्ये घुसले होते. पण काही तासांनंतर ते परत आपल्या प्रदेशात गेले. २०११ साली चीनी सैनिकांनी भारतीय सीमेमध्ये असणारी २५० मीटर उंच भींत सर करण्याचा प्रयत्न केलेला तेव्हा सुद्धा भारताने आक्षेप नोंदवलेला.