केंद्र सरकारने स्वीकारली टाटांची बोली, लवकरच होणार एअर इंडियाच्या मालकीचे हस्तांतरण


नवी दिल्ली – टाटा समूहाने तोटयात असलेल्या ‘एअर इंडिया’च्या खरेदीसाठी लावलेली सर्वश्रेष्ठ बोली अखेर मोदी सरकारने स्वीकारली आहे. त्यामुळेच एअर इंडिया कंपनीची मालकी आता पुन्हा एकदा जवळजवळ सात दशकांनंतर एअर इंडिया कंपनी मूळ मालकांच्या ताब्यात जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाने ‘टाटा’च्या बोलीला मंजूरी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

वेगवेगळ्या चार निविदा सरकारकडे ‘एअर इंडिया’च्या खरेदीसाठी आल्या होत्या. तरी सर्वाधिक बोली लावणारी ‘टाटा सन्स’ या स्पर्धेत आघाडीवर होते. ‘स्पाइसजेट’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांनीही निविदा दाखल केली होती. पण सर्वश्रेष्ठ बोली लावणाऱ्या टाटांकडे एअर इंडियाचा कारभार सोपवण्यात येणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे.

निर्धारित राखीव किमतीच्या आधारावर वित्तीय निविदांद्वारे लावण्यात आलेल्या बोलीचे मू्ल्यमापन करण्यात आले असून, सर्वाधिक बोली ‘टाटा सन्स’कडून आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले होते. कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली निर्गुतवणुकीसाठी स्थापन केलेल्या सचिवस्तरीय समितीकडून तपासणीही पूर्ण करण्यात आल्यानंतर टाटांची निवड करण्यात आली. आपली शिफारस त्यांनी अंतिम निर्णयासाठी ‘एअर इंडिया’च्या खासगीकरणासाठी स्थापण्यात आलेल्या शहा यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिगटाकडे सादर केल्यानंतर त्यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

केंद्राने जानेवारी २०२० पासून ‘एअर इंडिया’मधील १०० टक्के भागभांडवल विकण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्याचबरोबर, तिच्या उपकंपन्या म्हणजेच एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेडमधील १०० टक्के हिस्सा आणि एअर इंडिया सॅट्स एअरपोर्ट्स सव्‍‌र्हिसेस प्रा. लि.मधील ५० टक्के हिस्सा विकण्याचे सरकारने प्रस्तावित केले. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या प्रक्रियेस विलंब झाला. नंतर सरकारने एप्रिल २०२१ मध्ये उत्सुक कंपन्यांना पुन्हा वित्तीय बोली लावण्यास सांगितले. बोली लावण्यासाठी १५ सप्टेंबर ही अंतिम मुदत दिली गेली होती.