रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण जाहीर; रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्क्यांवर कायम


नवी दिल्ली – कोरोनामुळे देशाची खचलेली अर्थव्यवस्थेला आता हळूहळू उभी राहत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. आज सकाळी रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण जाहीर करण्यात आले असून यादरम्यान रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या. यात रिव्हर्स रेपो रेट 3.35% वर कायम असल्याचे त्यांनी सांगितले.

शक्तिकांत दास म्हणाले की, 4.25% वर मार्जिनल स्टँडिंग सुविधा दर आणि बँक दर कायम आहेत. 3.35% वर रिव्हर्स रेपो रेटही कायम आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत होत असलेल्या सुधारणेला गती मिळत आहे. मुद्राधोरण समितीच्या गेल्या बैठकीच्या वेळेच्या तुलनेत सध्या भारतीय अर्थव्यवस्था पुष्कळच सावरली आहे.

दास पुढे म्हणाले की, वाढीला बळकटी, चलन फुगवट्या संदर्भातील मार्ग अपेक्षेपेक्षा अधिक अनुकूल आहे. आम्हाला भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक मूलभूत तत्त्वांच्या लवचिकतेमुळे सामान्य परिस्थतीकडे वाटचाल करण्याची आशा आहे. एकूण मागणीत वाढ होत आहे तथापि, थोडी मंदगती कायम आहे. उत्पादन अद्यापि कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत कमीच आहे.

सावरण्याचा दर धोरणात्मक पाठबळावर अवलंबून असून तो असमान असलेला दिसतो. प्रत्यक्ष संपर्क येणारी क्षेत्रे अद्यापि पिछाडीवर असल्याचे दास यांनी सांगितले. शक्तिकांत दास यांनी सांगितले की, इंधनावरील अप्रत्यक्ष कर आकारणी विचारपूर्वक सांभाळली जात आहे. खर्च वाढल्याने येणारी महागाई सौम्य करणे हा त्याचा उद्देश आहे. तसेच अर्थव्यवस्था जपून पावले टाकत असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रतिकूल परिणाम होऊनही जीडीपीचे जवळजवळ सर्व घटक पहिल्या तिमाहीत Q1 मध्ये दरवर्षी वाढले, हे अर्थव्यवस्थेची लवचिकता दर्शवते, असेही ते म्हणाले.

दास यांनी पुढे सांगितलं की, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून ग्राहकांचा आत्मविश्वास वाढतो आहे, हे प्रयत्न खाजगी खपाला सहाय्यभूत ठरत आहेत, प्रलंबित मागणी आणि सणासुदीमुळे शहरी मागणी दुसऱ्या तिमाहीत आणखी वाढेल. पहिल्या अग्रिम अंदाजानुसार, 2021-22 मध्ये खरिपाचे उत्पादन विक्रमी झाल्यामुळे व कृषीक्षेत्रात लवचिक सुधारणा झाल्यामुळे ग्रामीण भागात मागणी वाढण्याची अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारच्या भांडवली खर्चात वाढ झाल्यास व वित्तीय स्थिती अनुकूल राहिल्यास, गुंतवणूक सुधारू शकेल. गुंतवणुकीच्या गतीत वाढ होण्याची लक्षणे दिसू लागली असल्याचे दास म्हणाले.