नीरज चोप्राचा ‘तो’ सुवर्ण भाला ‘एवढ्या’ कोटींना विकला गेला!


टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकत भालाफेकपटू नीरज चोप्राने इतिहास रचला होता. ट्रॅक अँड फील्ड इव्हेंट प्रकारात ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज देशातील पहिला खेळाडू ठरला. ज्या भाल्याचा थ्रो करून नीरजने सुवर्णपदक पटकावले होते, त्याने तो भाला पंतप्रधान मोदींना भेट म्हणून दिला होता. त्यानंतर मोदींना भेट म्हणून आलेल्या वस्तूंचा ई-लिलाव करण्यात आला. नीरज चोप्राच्या सुवर्णवेधी भाल्यावर या लिलावात तब्बल दीड कोटींची बोली लागली आहे. मोदींच्या वाढदिवसापासून म्हणजेच १७ सप्टेंबरपासून हा लिलाव सुरू होता. सर्व भेटवस्तूंपैकी नीरजच्या भाल्यावर सर्वात जास्त बोली लागली आहे.

७ ऑक्टोबर म्हणजेच गुरुवारी हा ऑनलाइन लिलाव संपला आहे. पण, मोदींनी मिळालेल्या एकूण १३४८ भेटवस्तूंपैकी काही वस्तू अद्याप विकल्या गेलेल्या नाहीत. सांस्कृतिक मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, काही वस्तूंवर गुरुवारी रात्रीपर्यंत बोली लावण्यात आल. परंतु ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळाडूंनी त्यांच्या खेळादरम्यान वापरलेल्या क्रीडा उपकरणांसह बहुतेक वस्तूंची बोली संध्याकाळी बंद करण्यात आली. एका निवेदनात मंत्रालयाने म्हटले आहे की, pmmementos.gov.in. वरील ई-लिलावादरम्यान ८,६०० हून अधिक बोली लागल्या आहेत.

सर्वात जास्त बोली लागलेल्या वस्तूंमध्ये सरदार पटेल यांचे शिल्प (१४० बोली), लाकडी गणेश (११७ बोली), पुणे मेट्रो लाईनचे स्मृतिचिन्ह (१०४ बोली) आणि व्हिक्टरी ज्योतीचे स्मारक (९८) लागल्या आहेत. तर, नीरज चोप्राचा भाला (₹ १.५ कोटी), भवानी देवीची ऑटोग्राफ केलेली फेन्स (₹ १.२५ कोटी), सुमित अंतिलचा भाला (₹ १.२ कोटी), टोकियो २०२० पॅरालिम्पिक दलाने ऑटोग्राफ केलेली अंगवस्त्रे (१ कोटी) आणि लवलीना बोर्गोहेनच्या ग्लोव्ह्जवर (९१ लाख) रुपयांची बोली लागली, अशी माहिती मंत्रालयाने दिली आहे.