दररोज ५ लाख कोरोना प्रकरणांना सामोरे जाण्यास आरोग्य सेवा सज्ज; नीती आयोग


नवी दिल्ली – केंद्र सरकारने गुरुवारी दररोज पाच लाख कोरोना प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी आरोग्य सेवा तयार केल्या असल्याची माहिती दिली आहे. पण, याचा अर्थ असा नाही की भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्यांची एवढी मोठी संख्या नोंदवली जाईल, असेही सरकारने म्हटले आहे. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल यांनी कोरोनाच्या संभाव्य वाढीच्या पार्श्वभूमीवर सज्जतेबाबत माहिती देताना पत्रकार परिषदेत सांगितले की, राज्यांकडून प्राप्त अहवालांनुसार, देशातील कोरोनाबाधितांसाठी ८.३६ लाख बेड उपलब्ध आहेत आणि याव्यतिरिक्त १० लाख (९,६९,८८५) आयसोलेशन बेड कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध आहेत. तसेच ४.८६ लाख ऑक्सिजन बेड आणि १.३५ लाख आयसीयू बेड उपलब्ध आहेत अशी माहिती डॉ.पॉल यांनी दिली आहे.

सध्या कोरोना प्रकरणांची संख्या कमी आहे, पण तयारी कमी नाही. दैनंदिन बाबी हाताळण्यासाठी मजबूत स्थितीत आहेत. केंद्र सरकारच्या सहभागासह खाजगी क्षेत्राने मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिलेल्या राज्य सरकारांद्वारे ही तयारी करण्यात आल्याचे व्ही. के. पॉल म्हणाले. लसीकरण आणि संसर्गानंतर व्हायरसची गतिशीलता ज्यामुळे हर्ड इम्युनिटी तयारे होऊ शकते. त्यासाठी आमच्याकडे सरळ सूत्र नाही.

जसे आपण पाहू शकतो, लसीकरणानंतरही कोरोना बाधितांची नोंद केली जात आहे आणि आम्ही अजूनही शिकत आहोत. ते सुरक्षित करण्यासाठी आम्ही आमच्या पातळीवर तयार राहू. आम्ही दररोज ४.५ ते ५ लाख करोना बाधितांची प्रकरणे हाताळण्याची तयारी करत आहोत, पण याचा अर्थ असा नाही की ते होईल, घडले पाहिजे किंवा घडू शकते, असे नीति आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पॉल पुढे म्हणाले की देशात कोरोना प्रतिबंधक लसींच्या उपलब्धतेचा प्रश्न नाही आणि संपूर्ण लसीकरणासाठी दुसरा डोस घेण्यासाठी लोकांना पुढे येण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोनाच्या विविध प्रकारांविषयी बोलताना पॉल म्हणाले की सध्या उपलब्ध आकडेवारीनुसार चिंता करण्यासारखे कोणतेही नवीन प्रकार नाहीत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल कोरोना पॉझिटिव्हिटी रेटचा उल्लेख करताना म्हणाले की, मिझोराम, केरळ, सिक्कीम, मणिपूर, मेघालय या राज्यांमध्ये साप्ताहिक सकारात्मकता दर ५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. २८ जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक सकारात्मकता ५ ते १० टक्क्यांदरम्यान आहे, तर ३४ जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक सकारात्मकता १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. कोरोनाचा धोका कायम आहे.

त्याचबरोबर आगामी सण दसरा, नवरात्री, दुर्गा पूजा, ईद, दिवाळी, ख्रिसमस आणि नवीन वर्षांच्या दृष्टीने पुढील तीन महिने अत्यंत महत्वाचे आहेत. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये खूप सावधगिरी बाळगायला हवी, असे लव अग्रवाल यांनी म्हटले आहे. आगामी सणाबद्दल, आरोग्य मंत्रालयाने लोकांना आवाहन केले की जर तुम्ही घरी राहून सण ऑनलाईन साजरा करू शकत असाल, तर तो साजरा करा.