टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयची नव्या जर्सीची घोषणा


नवी दिल्ली – आयपीएल स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून त्यानंतर टी-२० विश्वचषक स्पर्धेचे वेध लागले आहेत. सर्व संघ या स्पर्धेसाठी कसून सराव करत आहेत. टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडिया सज्ज आहे. या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया नव्या जर्सीत दिसणार आहे. याबाबतची माहिती बीसीसीआयने ट्विटरवर एक पोस्ट करत दिली आहे. त्यामुळे नव्या जर्सीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. १३ ऑक्टोबरला टीम इंडियाची नवी जर्सी लॉन्च केली जाणार आहे.


ट्विटरवर एक पोस्ट लिहित बीसीसीआयने याबाबतची माहिती दिली आहे. तुम्ही ज्या क्षणांची वाट पाहात आहात. तुमची ती प्रतिक्षा १३ ऑक्टोबरला संपणार आहे. याबाबत तुम्ही उत्साहित आहात ना!, अशी पोस्ट बीसीसीआयने केली आहे. आतापर्यंत निळ्या रंगाच्या जर्सीत टीम इंडिया खेळत आली आहे. या जर्सीमुळेत टीम इंडियाला ‘मेन इन ब्लू’ संबोधल जाते. भारतीय संघ गेल्यावर्षीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून गडद निळ्या रंगाची जर्सी परिधान केली आहे. ही जर्सी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेपुरती वापरली जाणार होती. पण त्यानंतर हीच जर्सी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही वापरण्यात आली.

१७ ऑक्टोबरपासून टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दुबईत २४ ऑक्टोबरला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आहे. २००७ पासून टीम इंडियाने टी-२० विश्वचषक जिंकलेला नाही. दुसरीकडे पाच वेळा एकदिवसीय विश्वचषक जेतेपद पटकावणारा ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. स्पर्धेचा हा सातवा हंगाम असून वेस्ट इंडिज स्पर्धेचा गतविजेता आहे आणि त्याने दोन वेळा विजेतेपद पटकावले आहे. याशिवाय, भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंड हे देखील प्रत्येकी एकदा विश्वचषक जिंकण्यात यशस्वी झाले आहेत.