जामीन फेटाळला; आर्यन खानचा आजचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात


मुंबई – मुंबईतील किल्ला न्यायालयात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. आर्यन खानच्या अडचणीत क्रूज पार्टीमध्ये ड्रग्जच्या प्रकरणामुळे आणखी वाढ झाली आहे. न्यायालयाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. सांगितले जात आहे की आता आर्यनचे वकील जामीनासाठी सत्र न्यायालयात जाऊ शकतात.

मुंबईच्या किल्ला कोर्टाने आर्यन खानची याचिका फेटाळली आहे. आर्यनची याचिका कायम ठेवण्यायोग्य नसल्यामुळे ती फेटाळली जात असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. अशा परिस्थितीत आता आर्यन खान आणि इतर सर्व आरोपींना आजची रात्र आर्थर रोड तुरुंगात काढावी लागणार आहे.

आर्यनसह इतर आरोपींना काल कोरोनामुळे एक रात्र तुरुंगाऐवजी एनसीबी कार्यालयात काढावी लागली. त्यांना आज जे जे रुग्णालयात तपासणी करून आर्थर रोड कारागृहात पाठवण्यात आले आहे. तर मुनमुन आणि नुपूर यांना भायखळा महिला कारागृहात पाठवण्यात आले आहे. आर्यनसह इतर आरोपीना ३ ते ४ दिवस क्वारंटाईन सेलमध्ये ठेवण्यात येईल.

मॅजिस्ट्रेट कोर्टात अंतरिम जामिनासाठी सतीश मानशिंदे यांनी अर्ज केला होता, जो फेटाळण्यात आला आहे. न्यायालयाने म्हटले की, या प्रकरणाची सुनावणी घेण्याचा आणि जामिनावर कारवाई करण्याचा त्यांना अधिकार नाही. सत्र न्यायालयात हा अर्ज करायला हवा होता. त्यामुळे आर्यन आणि इतरांच्या वकीलांनी सत्र न्यायालयात जायला हवे होते. एनडीपीएस कायद्यांतर्गत सत्र न्यायालयात जामीन अर्ज करावा लागेल. अशा परिस्थितीत आता सतीश मानशिंदे यांच्यासह इतर वकील सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी आर्यन खान आणि सात इतर आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आर्यन खानला कोठडी दिल्यानंतर आर्यन खानसह आठही जणांकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता.