शाही हिरे, पाचूचे चष्मे लिलावात

भारतातील मोगलकालीन १७ व्या शतकातील शाही खजिन्याचा भाग असलेले हिरे, पाचू जडविलेले दोन दुर्लभ चष्मे प्रथमच लिलावात आणले जात असून गुरुवारी लंदनच्या सोथबी ऑक्शन तर्फे या संदर्भातील घोषणा करण्यात आली आहे. या दोन्ही चश्म्यांची किंमत १५ व २५ लाख पौंड मानली जात आहे. त्यावर हिरे जडविले गेले आहेत. हिऱ्याच्या चष्म्याला ‘हलो ऑफ लाईट’ असे तर पाचूच्या चष्म्याला ‘ गेट ऑफ पॅराडाईज’ असे नाव आहे. २२ ऑक्टोबर पासून त्यांचे प्रदर्शन होणार आहे आणि २७ ऑक्टोबर पासून लिलाव सुरु होणार आहे.

सोथबीजचे अध्यक्ष एडवर्ड गिब्ज म्हणाले, मध्य पूर्व आणि भारत येथील ही दौलत म्हणजे रत्नपारखी आणि इतिहासकरांसाठी चमत्कार आहे. असा खजीना जगासमोर आणणे आणि जगाला त्याच्या निर्मितीमागचे रहस्य जाणून आश्चर्यात टाकणे रोमांचक आहे. १७ व्या शतकात मोगलाई काळात भारतात शाही धन, विज्ञान, कला सर्व एकाच वेळी एका असामान्य उंचीवर पोहोचले होते. अज्ञात राजकुमाराच्या सांगण्यावरून एका कलाकाराने हिऱ्यालाच आकार देऊन चष्मा बनविला. हा हिरा किमान २०० कॅरेटचा असावा असा अंदाज आहे.

दुसरा चष्मा पाचू पासून बनविला गेला असून हा पाचू किमान ३०० कॅरेटचा असावा. अतिशय उत्कृष्ट कलाकारीचा हा नमुना असून यातील कौशल्याला जोड नाही असे म्हणावे लागेल.