व्हॉटस अप बंद, टेलेग्रामला लागली लॉटरी

सोमवारी काही काळासाठी फेसबुक, व्हॉटस अप, इन्स्टा सेवा ठप्प झाल्याचा जबरदस्त फायदा व्हॉटस अपची प्रतिस्पर्धी टेलेग्रामला मिळाला असून टेलेग्रामशी या काळात ७० दशलक्ष म्हणजे ७ कोटी नवे युजर्स जोडले गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार व्हॉटस अप ठप्प झाल्यावर अमेरिकेत एकाच वेळी इतक्या लोकांनी टेलेग्राम डाऊनलोड करण्याचा प्रयत्न केला कि त्यामुळे त्याचा डाऊनलोड स्पीड एकदम कमी झाला.

फेसबुक, व्हॉटसअप, इन्स्टाची सेवा विस्कळीत झाल्याने कोट्यावधी युजर्सना आपसात संपर्क करण्यास अडचण आली आणि अनेकांच्या कामात अडथळे आले. याचा थेट फायदा टेलेग्रामला मिळाला. वास्तविक टेलेग्राम लाँच होऊन बराच काळ झाला आहे. व्हॉटसअप ला टक्कर देण्यासाठी मोठा गाजावाजा करून त्याचे लॉन्चिंग केले गेले होते. पण व्हॉटसअप अधिक युजर फ्रेंडली असल्याने व्हॉटसअपची लोकप्रियता कायम राहिली होती.

रॉयटर्स कडून मिळालेल्या माहितीनुसार टेलेग्रामने या काळात १ अब्ज डाऊनलोडचा टप्पा पार केला असून आता खऱ्या अर्थाने ते व्हॉटसच्या स्पर्धेत आले आहे. त्याच्या डेली ग्रोथ रेट मध्ये प्रचंड वाढ झाली आहे. टेलेग्रामचे संस्थापक पावेल ड्युरोव यांना हा सर्व प्रकार स्वप्नवत वाटतो आहे. विशेष म्हणजे या निमित्ताने व्हॉटसअप नंतर युजर्सची पसंती टेलेग्रामलाच आहे हे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.