देव्यागिरी, देशातील पहिली महिला महंत

सध्या देशात नवरात्र उत्सव सुरु असून दुर्गामातेच्या ९ विविध रूपांची पूजाअर्चा या दिवसात केली जाते. देशात दुर्गामातेची हजारो छोटी मोठी मंदिरे आहेत आणि नवरात्र काळात माता येथे विधीपूर्वक विराजमान झालेली दिसते. मंदिराचे पुजारी, महंत पूजा अर्चना, पाठ, सूक्ते म्हणण्यात व्यस्त झाले आहेत. मात्र महिला महंत फारश्या पाहायला मिळत नाहीत. अर्थात आज देशात अनेक महिला पुरोहित आहेत पण महंत फारश्या नाहीत. कुंभ मेळ्यात महिला साध्वीना नेतृत्व करायला मिळावे अशी मागणी होती. या पार्श्वभूमीवर देशातील पहिल्या महंत महिलेची माहिती करून घेणे उचित ठरेल.

लखनौच्या प्रसिद्ध मनकामेश्वर मंदिराच्या महंत देव्यागिरी देशातील पहिल्या महिला महंत आहेत. उत्तरप्रदेशातील बाराबंकी जिल्यात जन्मलेल्या देव्यागिरी यांच्या आयुष्यात घडलेली एक घटना त्यांना या पदापर्यंत घेऊन आली. बीएससी पॅथॉलोजी आणि त्यातच उच्च पदवी घेतल्यावर मेडिकल क्षेत्रात मानव सेवा करायची या इच्छेने त्या मुंबईला जाण्यास निघाल्या तेव्हा त्यांच्या मनात भोलेबाबाचे दर्शन घेऊन मग जावे असा विचार आला आणि त्या मनकामेश्वर मंदिरात आल्या. या मंदिरात त्या नेहमीच येत असत. पण त्या दिवशी मात्र त्यांना दर्शन घेताना येथून कुठेही जाऊ नकोस अशी भावना प्रबळ होत गेली. त्या क्षणी त्यांनी सगळे आयुष्य येथेच समर्पित करण्याचा निर्णय घेऊन १० जानेवारी २००२ रोजी संन्यास दीक्षा घेतली. यावेळी त्यांचे वय होते अवघे २२.

महंत केशवगिरी यांना त्यांनी गुरु मानले पण केशवगिरी यांनी त्यांना स्वीकारले नाही. २००४ मध्ये त्यांनी पूर्ण संन्यास घेतला. हा सारा प्रवास मुळीच सोपा नव्हता. अखेर केशवगिरी यांनी देव्यागिरी यांचा त्यांचावर असलेला विश्वास पाहून त्यांचे गुरुत्व पत्करले आणि ९ सप्टेंबर २००८ मध्ये त्यांना मनकामेश्वर मंदिराच्या महंत म्हणून नेमले. या निर्णयावर चोहोबाजूनी टीका झाली मात्र देव्यागिरी यांनी त्यांची या मार्गावरची वाटचाल धैर्याने सुरु ठेवली. आज त्यांना महंत म्हणून खूप सन्मानाने वागविले जाते.