हे सेलेब्रिटी इतके भरतात वीजबिल

बॉलीवूड सेलेब्रिटीजची लाईफस्टाईल, त्यांची घरे, त्यांच्या कार्स, मालमत्ता, ते करत असलेले प्रचंड खर्च नेहमीच चर्चेत असतात. असे असले तरी सर्वसामान्य माणसाप्रमाणे त्यांना सुद्धा घरपट्टी, पाणीपट्टी, वीजबिले असे खर्च करावे लागतातच. सर्वसामान्य माणसाला एखाद्या महिन्यात वीजबिल जास्त आले तर त्याचे खर्चाचे बजेट कोलमडते याचा अनुभव अनेकदा येतो. त्यातून आपले वीज महामंडळ एका खोलीच्या घरात राहणाऱ्यांना सुद्धा लाखांची बिले पाठवून शॉक देत असते ते वेगळे. पण अनेकांना महालांसारख्या अलिशान घरात राहणाऱ्या तारे तारकांना वीजबिले किती येत असतील असा प्रश्न पडतो.

अमली पदार्थ प्रकरणात अटक झालेला आर्यन खान सध्या चर्चेत आहे. वडील शाहरुख खान नेहमीच चर्चेत असतोच पण त्याचा बांद्रा येथील अलिशान मन्नत बंगला सुद्धा नेहमी चर्चेत असतो. शाहरुख येथे कुटुंबासह राहतो. बॉलीवूड किंग खान अशी ओळख असलेला शाहरुख त्याच्या या घरासाठी सर्वाधिक वीज बिल भरणारा कलाकार आहे. शाहरुख दर महिना या घरासाठी ४३ लाख रुपयाचे वीज बिल भरतो असे सांगितले जाते.

या यादीत दोन नंबरवर सैफ अली खान आहे. तो मुंबईच्या पॉश फोर्च्यून हाईट्स मध्ये राहतो. त्याला सुद्धा दर महिना ३० लाख रुपये वीजबिल येते. गेली ५१ वर्षे चित्रपट सृष्टीत असलेले आणि आजही कार्यरत बिग बी अमिताभ बच्चन यांचे मुंबईत चार बंगले असले तरी त्यांचे वास्तव्य जलसा या त्यांच्या जुहू येथील बंगल्यात असते. त्यांना दर महिना २२ लाखाचे वीज बिल येते.

दबंग सलमानखान त्याच्या गॅलेक्सी मधील घरासाठी सरासरी २३ लाखाचे वीज बिल भरतो तर आमीरखानचे वीज बिल ९ लाखाच्या घरात आहे. त्याचे घर बांद्रा मध्येच आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणला महिना सरासरी १३ लाखाचे वीज बिल येते असे समजते.