गिनीज बुक रेकोर्ड केल्यावर अजूनही वाढतेय या व्यक्तीचे नाक

सर्वात उंच, सर्वात बुटका, सर्वाधिक लांब केस अशी अनेक जागतिक रेकॉर्ड प्रसिद्ध गिनीज बुक मध्ये नोंदविली जात असतात. जगात सर्वाधिक लांब नाक असणाऱ्या जिवंत व्यक्तीचे रेकॉर्ड तुर्कस्तानच्या ७१ वर्षीय मेहमत ओजीयुरेक यांच्या नावावर ११ वर्षांखालीच नोंदले गेले असून आजही ते अबाधित आहे. मात्र रेकॉर्ड नोंदले गेल्यावर सुद्धा आपले नाक अजूनही लांब होते आहे असा दावा यांनी केला आहे.

३.५ इंची लांबीचे नाक असलेली जिवंत व्यक्ती अशी त्यांची नोंद गिनीजने घेतली आहे पण मेहमत याच्या मते त्यांचे नाक आता ३.५ इंचापेक्षा अधिक लांब झाले आहे. डेली स्टारने या संदर्भात दिलेल्या बातमीनुसार या लांब नाकामुळे मेहमत यांना अनेक अडचणी येत आहेत. लोकांकडून चेष्टा होणे हे तर नेहमीचेच. नाक चेहऱ्याची शोभा वाढवते हे खरे पण त्याचा आकार योग्य असेल तरच. अन्यथा ते चेहऱ्याची शोभा कमी करते याचा अनुभव मेहरत घेत आहेत. ते म्हणतात, सुरवातीला लोक हसायचे, कुचेष्टा करायचे तेव्हा वाईट वाटायचे पण नंतर सवय पडली आणि आता तर या नाकामुळे माझे नाव गिनीज मध्ये नोंद झाले आहे.

इतिहासात डोकावले तर सर्वाधिक लांब नाकाचे रेकॉर्ड इंग्लिशमन थॉमस वेडर्स यांच्या नावावर आहे. १८ व्या शतकातल्या या व्यक्तीचे नाक तब्बल ७.५ इंची म्हणजे १९ सेंटीमीटर होते. पण आता ते हयात नसल्याने सर्वाधिक लांब नाकाची जिवंत व्यक्ती म्हणून मेहमत यांची नोंद झाली आहे.