दरवर्षी जगभरात तब्बल ४,००,००० जणांचा मलेरियामुळे मृत्यू होतो. यात आफ्रिका खंडातील लहान मुलांची संख्या सर्वात जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अशा या जीवघेण्या मलेरिया आजारावरील जगातील पहिल्या लसीला मान्यता दिलीय. या मलेरिया लसीचे RTS S/AS01 असे नाव असून यामुळे मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूंवर नियंत्रण राखण्यात यश येणार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेची मलेरियावरील जगातील पहिल्या लसीला मान्यता
उन्हाळ्यातील जास्त तापमान असल्याने डासांचे प्रमाण कमी असते. पण डासांचे प्रमाण पावसाळ्यात वाढते. एनॉफिलीस नावाच्या मादी डासांची साठवून ठेवलेल्या पाण्यात उत्पत्ती होते. हा डास चावल्यास हिवताप (मलेरिया) होण्याचा धोका संभावतो.
पाण्याच्या डबक्यात गुरे, ढोरे तसेच पाळीव प्राणी बसतात, तसेच मोकळ्या हवेच्या ठिकाणी स्थानांतरित होतात. तसेच उन्हाळ्यात घरोघरी कुलर, वातानुकूलित यंत्र वापरले जाते. यासाठी पाण्याची साठवणूक केली जाते. याशिवायही विविध कारणांसाठी पाणी साठवून ठेवले जाते. पावसाळ्यातही विविध ठिकाणी पाण्याचे डबके साचते.
डासांची उत्पत्ती या सर्व ठिकाणी होते. हे डास साधारणत: रात्री चावा घेतात. यामुळेही मलेरियाची साथ पसरण्याचा धोका असतो. याची शक्यता जुलै ते डिसेंबर या पावसाळ्यातील महिन्यांमध्ये अधिक बळवते. या डासांकरिता दमट वातावरण पोषक ठरते. या आजारात थंडी वाजून ताप, घाम सुटणे व इतरही अनेक लक्षणे रुग्णांत दिसतात.
मलेरियाची लक्षणे
- सामान्यत: ताप, डोकेदुखी, उलटय़ा होणे.
- अशक्तपणा, चक्कर येणे, मळमळणे, शुद्ध हरपणे, थकवा येणे.
- तापाचे जंतू रक्तातून मेंदूपर्यंत जाऊन रुग्ण गंभीर होतो.
- गर्भधारणेदरम्यान हिवताप झाल्यास आईला, गर्भाला आणि नवजात बाळाला धोका संभावतो.
- गर्भवतीला हिवतापाची लागण झाल्यास गर्भावर विपरीत परिणाम संभावतो.
- कधी कधी डोके दुखणे, थकवा जाणवणे.
हा आजार प्रसाराचे प्रमाण कमी असलेल्या क्षेत्रात सर्व वयोगटाच्या लोकांना होऊ शकतो. पण प्रौढांना अतितीव्र आणि विविध गुंतागुंती होऊ शकतात. भारतामध्ये प्रसाराचे प्रमाण सामान्यत: कमी आहे. परंतु ईशान्येकडील राज्ये आणि ओदिशा, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेशाच्या मोठय़ा भागांमध्ये ते जास्त आहे. प्रसाराचे प्रमाण अधिक असलेल्या क्षेत्रात पाच वर्षांखालील मुले, पर्यटक, स्थलांतरित मजुरांना आजाराचा धोका जास्त असतो.
- मलेरिया हा जीवघेणा ठरू शकतो. मलेरिया प्लाज्मोडीयम विवियाक्स, प्लाज्योमीडयम मलेरीई आणि प्लाज्योडियम ओव्हेल या विषाणूंमुळे होतो.
- एनोफिलीस नावाच्या डासाच्या संक्रमणात्मक चाव्यातून तो पसरतो.
- संसर्गक्षम डासांने चावा घेतल्यानंतर १० ते १४ दिवसांनंतर माणसाला हा रोग होतो.
- पी. फाल्सीपारमद्वारे होणारा संसर्ग सर्वात जीवघेणा ठरू शकतो.
मलेरियापासून बचावासाठी
- मच्छरदाण्या वापरणे.
- सांडपाण्याचा निचरा करणे तसेच पाण्याची साठवणूक टाळणे.
- हिवतापाची साथ असेल तर सर्वाग झाकणारे कपडे वापरणे.
- शोषखड्डे तयार करावे.
- डास चावू नये म्हणून शक्य असल्यास क्रीम लावावे.
- बंद गटारे तयार करण्यावर भर द्यावा.
- जंतुनाशक फवारणी सर्वत्र करून घेणे आवश्यक.
मलेरियासाठी प्रतिबंधात्मक उपाय व उपचार
- रुग्णाची लक्षणे व तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच आजाराचे निदान शक्य आहे.
- आजाराचे त्वरित निदान करून योग्य उपचार घेणे.
- निदानाकरिता रक्ताच्या आवश्यक त्या सर्व चाचण्या करणे.
- पीसीआर तपासणी महाग असल्यामुळे डॉक्टर रॅपीड डायग्नोस्टिक टेस्टवर भर देतात.