शिक्षण क्षेत्रात डेक्कन कॉलेजचे महत्त्वपूर्ण योगदान – राज्यपाल


पुणे : डेक्कन कॉलेज देशासाठी वैभव असून या कॉलेजने देशासाठी महान, विद्वान रत्ने दिली आहेत. शिक्षण क्षेत्रात या महाविद्यालयाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

डेक्कन कॉलेज द्विशताब्दी कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे केंद्रीय संचार राज्यमंत्री देवू सिंह चौहान तर कार्यक्रमस्थळी डेक्कन कॉलेजचे अध्यक्ष ए. पी. जामखेडकर, मुख्य पोस्टमास्टर जनरल हरीश अग्रवाल, पुण्याच्या पोस्टमास्टर मधुमिता दास, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. नितीन करमळकर, डेक्कन कॉलेजचे कुलगुरू प्रमोद पांडे, उपकुलगुरू प्रसाद जोशी आदी उपस्थित होते.

कोश्यारी म्हणाले, एखाद्या संस्थेसाठी 200 वर्ष पूर्ण करणे ही खूप मोठी उपलब्धी असते. देशातील नामांकित महाविद्यालयामध्ये डेक्कन कॉलेजचे नाव घेतले जाते. महाविद्यालयातून आदर्श नागरिक आणि महान व्यक्ती घडविण्याची परंपरा यापुढील काळातही कायम राहावी. या महाविद्यालयातून विद्वान विद्यार्थी घडावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आपला देश जगाला शांतीचा संदेश देत असल्याचे सांगून राज्यपाल म्हणाले, आज संपूर्ण जग आपल्या देशाकडे पाहते आहे. आपला योगदिवस जगातील 180 देशामध्ये साजरा झाला. आपल्या विचारांचा जगभरात आदर केला जात आहे. आपल्या संस्कृतीविषयी संपूर्ण जगाला उत्सूकता आहे. देशाची हीच संस्कृती जपण्याचे कार्य अशा शैक्षणिक संस्थामधून होत आहे. अशा गौरवशाली इतिहास असलेल्या संस्थांचे देशविकासातील योगदान अविस्मरणीय असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

केंद्रिय राज्यमंत्री चौहान म्हणाले, डेक्कन कॉलेजचा इतिहास व योगदान देशासाठी महत्त्वपूर्ण आहे. डेक्कन कॉलेजचे देशासाठी लढणाऱ्या महान व्यक्तींच्या जीवनात महत्त्वाचे योगदान आहे.अशा संस्थांनी देशाचा सन्मान वाढविला असल्याने संस्थेच्या कार्याचा गौरव म्हणून टपाल तिकीट प्रकाशित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्यपाल महोदयांच्या हस्ते डेक्कन कॉलेजवर टपाल तिकीट प्रकाशन तसेच विविध उप्रकमांची माहिती असलेल्या पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविकात कुलगुरू पांडे यांनी डेक्कन कॉलेज व विविध उपक्रमाची माहिती दिली.