साखर कारखान्यांवरील आयकर विभागच्या कारवाईनंतर जयंत पाटलांचा दावा; राष्ट्रवादीचे सर्व नेते निर्दोष


पुणे – आयकर विभागाने आज पुणे, सातारा आणि नंदुरबार परिसरातल्या पाच साखर कारखान्यांवर धाड टाकत कारवाई केली आहे. या साखर कारखान्यांविरोधात किरीट सोमय्या यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. यात जरंडेश्वर साखर कारखान्याचाही समावेश आहे. कारखान्याच्या संचालकपदी अजित पवारांचे निकटवर्तीय असल्याचीही माहिती मिळत आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी याविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आज पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीचे जयंत पाटील यांनी दर्शन घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, आमच्या नेत्यांची भाजपचे पुढारी नावे घेतात आणि पाठोपाठ ईडी, सीबीआय येते. भाजपने आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचे कारस्थान केले आहे. राष्ट्रवादीचा धसका भारतीय जनता पक्षाने का घेतला आहे, हे विचार करण्यासारखे आहे. पण आमचा कायद्यावर विश्वास आहे. छगन भुजबळ यांनाही असाच त्रास देण्याचा प्रयत्न झाला, पण ते निर्दोष सुटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते निर्दोष आहेत. कोणताही गैरव्यवहार त्यांच्याकडून झालेला नाही, तरी त्यांना बदनाम करणे हाच यामागचा हेतू आहे. या देशातील सर्व तपास यंत्रणा भाजप चालवत आहे.

पाटील यांनी यावेळी लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली आहे. ते याबद्दल बोलताना म्हणाले, राज्य मंत्रिमंडळाने लखीमपूरला घडलेल्या घटनेबद्दल काल खेद व्यक्त केला आहे. आम्ही सर्व पक्षांच्या वतीने, महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे आणि त्यामुळे संतापून जाऊन भारतीय जनता पार्टीने त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लखीमपूरच्या दुर्घटनेला भारतीय जनता पक्षच जबाबदार आहे. भारतातील सर्व शेतकरी आता पेटून उठला आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे धाडसत्र करुन लक्ष वळवण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहे.