ऋतिक रोशनचा आर्यन खानला पाठिंबा


एनसीबीने शनिवारी रात्री मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर छापा टाकला. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसोबत आणखी काही लोकांना या छाप्यामध्ये ताब्यात घेण्यात आले. आर्यनला रविवारी अटक करण्यात आली. त्यानंतर ४ ऑक्टोबरला त्याची कोठडी ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली.

आर्यन खानची एनसीबी कोठडी आज संपत आहे. पण, एनसीबीने काल रात्री उशिरा मुंबईतून एका परदेशी ड्रग पेडलरला अटक केल्यानंतर आर्यन खानची कोठडी वाढवण्याची मागणी करण्याची शक्यता आहे. दरम्यान, एक पोस्ट शेअर करत बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनने आर्यन खानला पाठिंबा दिला आहे. त्याची पोस्ट सध्या चर्चेत आहे.


आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ऋतिकने एक पोस्ट शेअर केली आहे. माझा प्रिय आर्यन, जीवन हा एक विचित्र प्रवास आहे. कारण अनेक गोष्टी या अनिश्चित असतात. ईश्वर फार दयाळू आहे. तो कणखर व्यक्तींनाच कठीण चेंडू खेळण्याची संधी देतो, असे म्हणत ऋतिकने संयमी आणि एखाद्या कठीण परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत दाखवणाऱ्यांवरच असा प्रसंग येतो, असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ऋतिक पुढे म्हणाला, तू आता या परिस्थितीचा सामना करत आहे. तुमच्यामधील एका हिरोला बाहेर आणण्यासाठी या गोष्टी आयुष्यात होणे गरजेचे आहे. पण सावध रहा. कारण या गोष्टी तुझ्यामधील दयाळूपणा, प्रेम अशा अनेक गोष्टींवर परिणाम करतात. ऋतिकने या पोस्टमध्ये आर्यनचा फोटो शेअर केला आहे.