कोरोना काळात देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली असताना भारतीय उद्योगपतींच्या संपत्तीत 50 टक्क्यांची वाढ


नवी दिल्ली – भारतातील 100 सर्वाधिक श्रीमंत लोकांची या वर्षीची फोर्ब्स यादी जाहीर झाली असून रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी या यादीत सलग 14 व्या वर्षी पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यांच्यानंतर अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी हे दुसऱ्या स्थानावर आहेत. देशाची अर्थव्यवस्था कोरोना काळात डबघाईला आली असताना, त्याचबरोबर सामान्य माणूस रस्त्यावर आला असताना भारतीय उद्योगपतींच्या संपत्तीत तब्बल 50 टक्क्यांची वाढ झाली असल्याचे या यादीमुळे स्पष्ट झाले आहे.

रिलायन्सचे मुकेश अंबानी या यादीत सर्वोच्च स्थानी असून त्यांची संपत्ती 92.7 अब्ज डॉलर्सवर पोहोचल्याचे फोर्ब्जने सांगितले आहे. मुकेश अंबानी या यादीत सन 2008 पासून पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर दुसरा क्रमांक अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांचा असून त्यांची संपत्ती ही 74.8 अब्ज डॉलर्स असल्याचे फोर्ब्स ने म्हटले आहे.

भारतातील टॉपच्या शंभर उद्योगपतींची संपत्ती गेल्या वर्षभराच्या काळात तब्बल 257 अब्ज डॉलर्सनी वाढली असून ती 775 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. या यादीतील 80 हून जास्त अब्जाधीशांच्या संपत्तीत या वर्षी वाढ झाली आहे, तर एक अब्ज डॉलर्सहून अधिकची वाढ 61 जणांच्या संपत्तीत झाली आहे.