काँग्रेस आमदाराचे पंतप्रधान मोदींना चलनी नोटांवरून गांधींचा फोटो काढून टाकण्यासाठी पत्र


जयपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आणि माजी मंत्री भरत सिंह यांनी एक पत्र लिहिल्यामुळे सध्या ते चांगलेच चर्चेत आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोटा ग्रामीणच्या सांगोडमधील काँग्रेसचे आमदार भरत सिंह यांनी एक पत्र लिहिले आहे, ज्यात त्यांनी महात्मा गांधी यांचा 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवरुन फोटो काढून टाकण्याची मागणी केली आहे.

आपल्या पत्रात भरत सिंह यांनी लिहिले की महात्मा गांधी हे सत्याचे प्रतीक आहेत आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 500 आणि 2000 च्या नोटांवर महात्मा गांधींचे चित्र आहे. त्याचवेळी, त्यांनी सांगितले की या लाचखोरीच्या व्यवहारासाठी नोटा वापरल्या जातात, म्हणून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला दिला आहे की 500 आणि 2000 च्या नोटांवरुन गांधीजींचा फोटो काढून टाकल्यानंतर फक्त त्यांचा चष्मा किंवा अशोकचक्राचा फोटो लावावा.

पत्रात माजी मंत्री भरत सिंह पुढे म्हणतात की, देश आणि समाजात मागील 75 वर्षात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) राजस्थानमध्ये आपले काम करत आहे. तसेच, जानेवारी 2019 ते डिसेंबर 31, 2020 या मागील 2 वर्षात राज्यात 616 गुन्हे नोंदवले गेले आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ट्रॅपमध्ये लाचेची रक्कम 500 आणि 2000 च्या नोटांमध्ये वापरली जात असल्याचे समोर आले आहे. तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या फोटोसह 500 आणि 2000 च्या मोठ्या नोटा बार, मद्य पार्टी आणि इतर पार्ट्यांमध्ये नाचण्या गाण्याऱ्यांवर उडवले जातात.

महात्मा गांधींचा फोटो या नोटांवर छापला गेला आहे आणि त्यामुळे गांधीजींच्या सन्मानाला धक्का पोहचत आहे. तसेच गांधींचा फोटो फक्त 5, 10, 20, 50, 100 आणि 200 च्या नोटांवर छापला पाहिजे. या छोट्या नोटांबाबत ते म्हणाले की, या नोटा गरिबांसाठी उपयुक्त आहेत.