भाजपच्या राष्ट्रीय नेत्या झाल्या चित्रा वाघ


मुंबईः भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत चित्रा वाघ यांचा समावेश झाला. चित्रा वाघ यांची महिलांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्यासाठी ख्याती आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या काही नेत्यांची चित्रा वाघ यांच्या आक्रमक आंदोलनांमुळे पंचाईत झाली आहे. या आंदोलनांची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीने चित्रा वाघ यांचा राष्ट्रीय पातळीवर संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी कार्यकारिणीसाठी निमंत्रित आणि स्थायी निमंत्रित पदांवर नियुक्त्या केल्याचे जाहीर केले. पक्षाची ८० जणांची राष्ट्रीय कार्यकारिणी समिती नड्डा यांनी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील आठ नेत्यांचा समावेश झाला आहे. या आठ नेत्यांमध्ये पंकजा मुंडे आणि चित्र वाघ या दोन महिला नेत्या आहेत. महाराष्ट्रातून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, प्रकाश जावडेकर, विनय सहस्रबुद्धे, विनोद तावडे, सुनिल देवधर, पंकजा मुंडे, चित्रा वाघ या नेत्यांचा भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश झाला.

नड्डा अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, प्रकाश जावडेकर, विनय सहस्रबुद्धे आणि चित्रा वाघ यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश झाला. विनोद तावडे, सुनिल देवधर आणि पंकजा मुंडे यांचा पुन्हा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश झाला.