लखीमपूर हिंसाचारावरुन भाजपला घरचा आहेर देणाऱ्या वरुण आणि मनेका गांधींना भाजपचा मोठा धक्का


नवी दिल्ली – भाजपने नुकतीच आपली राष्ट्रीय कार्यकारिणीची नवी यादी जाहीर केली असून पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना या यादीत स्थान देण्यात आले आहे. लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना गेल्यावेळी मार्गदर्शक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. पण, आता त्यांचा समावेश राष्ट्रीय कार्यकारिणीत करण्यात आला आहे. दरम्यान सध्या विरोधक लखीमपूर हिंसाचारावरुन भाजपला धारेवर धरत असताना पक्षाला घरचा आहेर देणाऱ्या वरुण गांधींना भाजपने मोठा धक्का दिला आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी ८० सदस्यांची यादी भाजपने जाहीर केली असून यामध्ये वरुण गांधींना स्थान देण्यात आलेले नाही. तसेच मनेका गांधी यांनाही पक्षाने वगळले आहे. ही यादी भाजपध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जाहीर केली आहे. लोकसभेत पिलभीत मतदारसंघाचे वरुण गांधी प्रतिनिधित्व करतात, तर सुलतानपूर येथून मनेका गांधी खासदार आहेत.

कृषी कायदे असोत किंवा लखीमपूर खेरी हिंसाचा वरुण गांधी नेहमीच आपलं परखड मत मांडत आले आहेत. त्यांनी गुरुवारी लखीमपूर खेरी येथील घटनेचा व्हिडीओ ट्वीट करत आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. सध्या सोशल मीडियावर लखीमपूर खेरी हिंसाचाराचा एक नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत भरधाव वेगाने धावणारी एसयुव्ही शेतकऱ्यांना चिरडून पुढे जात असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ विरोधी पक्षातील नेत्यांनी शेअर करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप खासदार वरुण गांधी यांनीदेखील व्हायरल झालेला हा व्हिडीओ शेअर करत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. ही हत्या असल्याचे वरुण गांधी यांनी यावेळी म्हटले आहे.

वरुण गांधी व्हिडीओ शेअर करताना म्हणाले की, या व्हिडीओत सर्व काही स्पष्ट आहे. हत्या करुन आंदोलकांना शांत केले जाऊ शकत नाही. निष्पाप शेतकऱ्यांच्या रक्तासाठी जबाबदार घेणे आवश्यक आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात क्रूरता आणि अहंकाराचा संदेश पोहोचण्यापूर्वी न्याय झाला पाहिजे.