आर्यन खानचा एनसीबी कोठडीमधील मुक्काम दोन दिवसांनी वाढला


मुंबई – क्रूझवर ड्रग्ज पार्टी केल्याच्या आरोपावरून शनिवार, २ ऑक्टोबरपासून बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान एनसीबीच्या ताब्यात आहे. आर्यनची कोठडी आज संपणार असल्यामुळे मुंबईतील न्यायालयात त्याला आज हजर करण्यात आले होते. आर्यनच्या वकीलांनी पुन्हा एकदा जामीन याचिका दाखल केली होती. पण एनसीबीने यावर ११ ऑक्टोंबर पर्यंत कोठडी मागितली आहे. दरम्यान, न्यायालयाने आरोपींना ९ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.

न्यायालयाने या प्रकरणात आणखी तपास गरजेचा असल्याचे म्हटले आहे. चौकशीच्या आधारावर, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोठडी आवश्यक असल्याचे न्यायालयाने सुनावणी दरम्यान स्पष्ट केले. या ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांची कोठडीही संपत आहे. तिघांनाही दुपारी न्यायालयात हजर केले गेले होते. अरबाज मर्चंटच्या वकिलाने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. यासोबतच वकिलांनी दुसरी याचिका दाखल केली असून त्यात एनसीबीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

न्यायालयात आर्यनचे वकील सतीश मानशिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. आर्यनच्या विधानानुसार त्याला अटक करण्यात आली आणि गेटवरुन ताब्यात घेण्यात आले. अधिकाऱ्यांबाबत त्याची कोणतीही तक्रार नाही. या प्रकरणात पहिल्या दिवशी, मी रिमांडसाठी तात्काळ सहमत झालो होतो. विचार केला की तपासात काही विकास होईल. पण काही अटके व्यतिरिक्त या प्रकरणात आणखी काही घडले नाही. काल, जेव्हा अर्चित कुमारला झाली तेव्हा त्यांनी मर्चंड आणि खान यांचा याच्याशी संबंध आहे की हे तपासायला पाहीजे होते. पण असे झाले नसल्याचे मानशिंदे आर्यनची बाजू मांडतांना न्यायालयात म्हणाले.