कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर सहा महिन्यांनंतर शरीरातील अँटीबॉडी कमी होतात ; इस्त्रायलच्या संस्थेचा अभ्यास


जेरुसलेम : इस्त्रायलच्या संस्थेने केलेल्या एका अभ्यासातून फायझर आणि बायोएमटेक कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर सहा महिन्यानंतर त्या लसीचा प्रभाव कमी होत जातो आणि शरीरातील अँटीबॉडीज कमी होत जातात, असे समोर आले आहे. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांच्या शरीरातील अँटीबॉडी अधिक वेगाने कमी होत असल्याचेही समोर आल्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन डोसनंतर लसीचा तिसरा डोस म्हणजेच बुस्टर डोस घेणे अत्यावश्यक असल्याचे या अभ्यासात सांगण्यात आले आहे.

शरीरात असलेल्या अँटीबॉडी या लसीच्या माध्यमातून सहा महिन्यांनंतर हळूहळू कमी-कमी होत जातात. इस्त्रायलच्या पाच हजार कर्मचाऱ्यांवर केलेल्या अभ्यासातून हे स्पष्ट झाले असून ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’ या मॅगझिनमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. तरुणांच्या तुलनेत वृद्धांच्या शरीरातील अँटीबॉडी या अधिक वेगाने कमी होतात. हा अभ्यास इस्त्रायलच्या शेबा मेडिकल सेंटर या संस्थेकडून करण्यात आला आहे.

दरम्यान कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या डोसनंतर सहा महिन्यांनी तिसऱ्या किंवा बूस्टर डोसच्या गरजेवर पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या सायरस पूनावाला यांनी या आधीच भर दिला होता.

तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी ऑगस्ट महिन्यातील एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितले होते की, कोरोनाच्या ताज्या आकडेवारीवरुन ही गोष्ट निश्चितच म्हणू शकतो की सध्या बूस्टर डोसची गरज नाही. यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे.

जोपर्यंत गरीब देशांमधील सर्वांचे लसीकरण होत नाही, तोपर्यंत जगातील श्रीमंत देशांनी आपल्या नागरिकांना बूस्टर डोस देण्याबाबत विचारही करु नये. गरीब देशांतील नागरिकांना लसीचे दोन डोस उपलब्ध करुन देण्याच्या लक्ष्यापासून आपण अद्यापही दूर असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे मत आहे.