आयकर विभागाच्या धाडसत्रावर अजित पवार म्हणतात…


मुंबई : आयकर विभागाने कुठे आणि कधी छापेमारी करावी हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. माझ्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांचे सर्व कर वेळेवर भरले जातात. मी स्वत: अर्थमंत्री असल्यामुळे याची जातीने काळजी घेतो. आता ही धाड आयकर विभागाने राजकीय हेतूपोटी टाकली आहे का?, याबाबत तेच जास्त सांगू शकतील. माझ्या संबंधित नातेवाईकांच्या कंपन्यांवर धाडी टाकल्या जात आहेत. ते अजित पवारांचे नातेवाईक आहेत म्हणून आता त्यांच्यावर धाडी टाकत आहेत. याचे मला वाईट वाटते, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी आयकर विभागाच्या धाडसत्रावर दिली आहे.

अजित पवार पुढे म्हणाले की, माझ्या बहिणींशी संबंधित संस्थांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या. त्यांचे लग्न झाले, सुखी संसार आहे. त्यांचा राजकारणाशी दुरान्वयेही संबंध नाही. ते अजित पवारांचे नातेवाईक आहेत म्हणून त्यांच्यावर धाडी टाकत आहेत. याचे मला वाईट वाटत आहे. एवढ्या खालच्या पातळीवरच राजकारण होत आहे, हे वाईट असल्याचेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, माझ्यावर धाड टाकल्या असत्या तर मला काही वाटले नसेत, पण माझ्या बहिणी आहेत, माझे त्यांच्याशी नाते आहे म्हणून धाड टाकतात, याच खूप वाईट वाटते. केंद्राने केंद्राचे काम करावे आणि राज्याने राज्याचे काम करावे, असंही ते म्हणाले, केंद्रात जो सत्तेवर आहे त्यांच्या कुठल्या नेत्यावर आत्तापर्यंत धाड टाकली आहे का ? आता हे लोकांनी पाहायला हवे की देशाचा विकास करण्यासाठी आपण यांना सत्ता दिली. पण हे वेगळेच प्रकार सुरू आहेत.