केंद्रीय मंत्र्यांकडून जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाच्या नामकरणाची घोषणा


नवी दिल्ली – देशातील शहरे, योजना आणि संस्थांनंतर आता राष्ट्रीय उद्यानांची नावे देखील बदलली जाणार आहेत. देशातील प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यानांपैकी एक असलेल्या जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाचे नामकरण रामगंगा राष्ट्रीय उद्यान असे करण्यात येईल. एएनआय या वृत्तसंस्थेशी बुधवारी बोलताना जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचे संचालक म्हणाले की, केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री अश्विनीकुमार चौबे ३ ऑक्टोबर रोजी या उद्यानाला भेट देण्यासाठी आले होते, यावेळी या उद्यानाचे नामकरण रामगंगा राष्ट्रीय उद्यान केले जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच या प्रस्तावाबाबत औपचारिकता पूर्ण झाली आहे आणि लवकरच या संदर्भात घोषणा केली जाऊ शकते, असेही ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री चौबे येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत वाघांच्या संरक्षणासाठी काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान आले होते. उद्यानाला भेट देऊन त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच धनगढीमध्ये बांधलेल्या संग्रहालयाला भेट देण्यासाठी आले असता त्यांनी विझिटर्स बूकमध्ये लिहिलेल्या संदेशात ‘रामगंगा राष्ट्रीय उद्यान’ लिहिले असल्याची माहिती मिळत आहे. पाखरोमध्ये वाघ सफारी तयार करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती आणि त्या दिशेने काम सुरू आहे, असे याठिकाणी चौबे म्हणाले होते.

राष्ट्रीय उद्यानांच्या बाहेर स्थलांतरित झालेल्या लोकांच्या कुटुंबांना येत्या काही दिवसांत १५ लाख रुपयांची भरपाई दिली जाईल. राष्ट्रीय उद्यानातील रहिवाशांचे स्थलांतर त्यांना वीज, पाणी आणि इतर सुविधा यासारख्या चांगल्या पायाभूत सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने करण्यात येत, असल्याचेही त्यांनी सांगितले.