एनसीबीने सांगितला कार्डेलिया क्रूझवरील कारवाईचा सविस्तर घटनाक्रम


मुंबई – मुंबईच्या केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर २ ऑक्टोबर रोजी कार्डेलिया क्रूझवर छापेमारी केली आणि ८ जणांना ताब्यात घेतले. यामध्ये आर्यन खान व्यतिरिक्त यात मुनमुन धामेचा, अरबाज मर्चंट, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा यांनाही विविध प्रकारच्या ड्रग्ससह ताब्यात घेतल्याची माहिती एनसीबीने आज पत्रकार परिषदेत दिली.

कार्डेलिया क्रूझवर २ ऑक्टोबरला केलेल्या या कारवाईत आर्यन खानसह आठ जणांजवळून पाच ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या व एक लाख ३३ हजारांची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच मोहक जसवालच्या माहितीनंतर जोगेश्वरीतून अब्दुल शेखला ताब्यात घेतल्याचेही एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे ४ ऑक्टोबरला गोरेगावमध्ये एनसीबीने कारवाई केली, याठिकाणी एका व्यक्तीला अमली पदार्थासह अटक केली.

या क्रूझवर मनीष राजगरीया जो पाहुणा म्हणून आला होता, त्याच्याकडूनही ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय अरविंद साहू नावाच्या एका व्यक्तीला देखील अटक करण्यात आली आहे. क्रूझवर साहू ड्रग्स विकत होता, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर या प्रकरणात ५ ऑक्टोबरला आणखी चार जणांना पुराव्यांच्या आधारे अटक करण्यात आली. त्यामध्ये गोपालजी आनंद, समीर सेहगल, मानव सिंघल आणि भास्कर अरोरा यांचा समावेश आहे. हे सर्वजण एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीशी संबंधित होते. त्यानंतर अचित कुमारला अटक करण्यात आल्याची माहिती एनसीबी अधिकाऱ्यांनी दिली.

या प्रकरणात प्रभाकर सैल, किरण गोसावी, मनीष भानुशाली, ऑर्बे गोमेज, आदिल उस्मानी, वी वेगांकर, अर्पणा राणे, प्रकाश बहादूर, शोएब फैज आणि मुज्जमिल इब्राहिम हे प्रत्यक्षदर्शी होते, त्यांनी कारवाईत मदत केल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. तसेच एनसीबीवर करण्यात येत असलेले आरोप हे तथ्यहीन असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आम्ही नि:पक्षपातीपणे आणि कायद्याच्या चौकटीत राहून करत असल्याचे या अधिकाऱ्याने म्हटले आहे.