एनसीबीने मुंबईतील डोंगरी परिसरातून जप्त केले १५ कोटींचे हेरॉईन


मुंबई – २ ऑक्टोबरपासून केंद्रीय अंमलीपदार्थ विरोधी पथकाने म्हणजेच एनसीबीने सुरु केलेल्या धाडींचे सत्र सलग चौथ्या दिवशीही सुरु आहे. मुंबईमधील डोंगरी भागामध्ये आज टाकलेल्या एका छाप्यामध्ये एनसीबीने दोन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून सात किलो अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईमधील अमंली पदार्थ विरोधी पथकाच्या तुकडीने सात किलो हेरॉईनसहित दोन जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई मुंबईमधील डोंगरी भागामध्ये करण्यात आली असून ताब्यात घेण्यात आलेल्या हेरॉईनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये १५ कोटी रुपये एवढी आहे.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला कोर्डेलिया क्रूझवर पार्टी करण्यासाठी अंमलीपदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी अटक केल्याप्रकरणी केंद्रीय अंमलीपदार्थ विरोधी पथकाने कार्यक्रम आयोजन करणाऱ्या कंपनीशी संबंधित चौघांसह आठ जणांना अटक केल्यानंतर आज सकाळपासून पुन्हा मुंबईमध्ये एनसीबीचे धाडसत्र सुरु झाले. या आधी पवईतून एका व्यक्तीला अटक करण्यात आली. पवईमध्ये अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव अंकित कुमार असे असून त्याच्याकडेही अंमलीपदार्थ आढळून आले आहेत. मंगळवार रात्रीपासून एनसीबीकडून वांद्रे, जुहू आणि गोरेगाव परिसरात ठिकठिकाणी छापे मारण्यात येत आहेत.