नवाब मलिकांच्या आरोपांना मनिष भानुशालीचे प्रत्युत्तर


मुंबई – रविवारी पहाटेच्या सुमारास केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) मोठी कारवाई केली. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसहीत आठ जणांना या प्रकरणामध्ये एनसीबीने अटक केली होती. त्या क्रूझवर जाऊन एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तपासणी सुरु करत ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेत एनसीबी अधिकारी बनून भाजपचे नेते कारवाई करतात, असा खळबळजनक आरोप केला आहे.

मनिष भानुशाली यांचे नाव या प्रकरणात चर्चेत आले आहे. मनिष भानुषाली हे भाजपचे उपाध्यक्ष आहेत. एनसीबीच्या कारवाईदरम्यान ते आर्यन खान, अरबाज मर्चंटला घेऊन जातांना दिसले. मनिष भानुशाली यांचे फोटो पंतप्रधान मोदी आणि अमित शहा, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यासोबत असल्यामुळे भानुशाली यांच्यासोबत एनसीबीचे काय संबंध आहेत? असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.

मनिष भानुषाली यांनी या पार्श्वभूमीवर मुंबई तकला प्रतिक्रिया दिली आहे. मनिष भानुशाली म्हणाले, ड्रग्ज पार्टी होणार असल्याची माहिती मला मिळाली होती. ड्रग्ज युवकांना कमकुवत करत आहे. यांना शिक्षा झाली पाहिजे. तसेच युवकांना नशेच्या जाळ्यात ढकलणाऱ्यांना रोखले पाहिजे. मी याबाबत एनसीबी अधिकाऱ्यांना माहिती दिली. यावर कारवाई करण्याचे मला अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी यशस्वी कारवाई केली.

छापेमारी दरम्यान तुम्ही तिथे गेले होता का? यावर बोलतांना मनिष भानुशाली म्हणाले, या कारवाईत आमचा सहभाग नव्हता. एनसीबीने ही पुर्ण कारवाई केली आहे. आम्हाला साक्ष नोंदवायची होती, म्हणून आम्ही तिथे गेलो होतो. त्यांना आम्ही पकडले नाही. जे देशहिताचे काम आहे, ते आम्ही केले. जे आरोप नवाब मलिक करत आहेत, त्यात तथ्य नाही. भाजपमध्ये माझ्याकडे कुठलेही पद नाही आणि के. पी. गोसावी कोण आहेत हे देखील मला माहित नाही.