महत्वाच्या शस्त्रक्रियेसाठी एकनाथ खडसे आयसीयूमध्ये दाखल


मुंबई – मुंबईमधील रुग्णालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना दाखल करण्यात आले आहे. एक महत्वाची शस्त्रक्रिया खडसेंवर करण्यात येणार असून यासाठीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे.

आज मुंबईतील सेशन कोर्टामध्ये पुण्यामधील जमीन घोटाळा प्रकरणी खडसे अनुपस्थित राहिले होते. न्यायालयाला याच अनुपस्थितीसंदर्भात माहिती देताना वकिलांनी खडसे आजारी असल्याचे सांगितले. एक महत्वाची शस्त्रक्रिया खडसेंवर होणार आहे. त्यासाठी त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वकिलांनी न्यायालयाला सांगितल्याचे टीव्ही ९ ने दिलेल्या आपल्या वृत्तात म्हटले आहे.

एकीकडे वकिलांनी खडसेंविरोधातील सुनावणीमध्ये त्यांची बाजू मांडली असताना दुसरीकडे खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी याच प्रकरणात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. याप्रकरणी ईडीकडून चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. त्यात खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी या दोघांची आरोपी म्हणून नावे आहेत. हे प्रकरण २०१६ सालचे आहे. खडसे त्यावेळी महसूल मंत्री होते. याच प्रकरणामध्ये खडसेंचे जावई गिरीश चौधरी सध्या अटकेत आहेत.

पण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसेंच्या वकिलांनी दिलेल्या माहितीवरुन शंका उपस्थित करत टीका केली आहे. एकनाथ खडसे हे न्यायालयासमोर खोटे बोलत असल्याचा आरोप दमानिया यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.