काल दिवसभरात देशात 18,833 कोरोनाबाधितांची नोंद, तर 278 जणांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधिताच्या आकडेवारीत घट झाल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत असले तरी धोका अद्याप टळलेला नाही. देशातील सक्रिय रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्ण सध्याच्या घडीला केरळमध्ये आहेत. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 18,833 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 278 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर काल दिवसभरात 24770 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या सगळ्यात विशेष गोष्ट म्हणेज देशातील सक्रिय रुग्णांची संख्या अडीच लाखांहून कमी झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ही मागील 203 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. त्याचबरोबर आतापर्यंत देशात तीन कोटी 38 लाख 71 हजार 881 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. ज्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे चार लाख 49 हजार 538 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 31 लाख 75 हजार 665 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकडेवारीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात राज्यात 2,401 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 840 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत राज्यात 63 लाख 88 हजार 899 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.32 टक्के आहे. तर राज्यात काल (मंगळवारी) 39 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असल्यामुळे राज्याचा डेथ रेट 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 593 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

काल दिवसभरात आर्थिक राजधानी मुंबईत 433 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 525 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत मुंबईत 7,22,096 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर गेल्या 24 तासात मुंबईत दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4438 सक्रिय रुग्ण आहेत.