विनाअनुदानित 14.2 किलोंचा घरगुती सिलेंडर 15 रुपयांनी महागला


नवी दिल्ली : सर्वसामान्य नागरिक वाढत्या महागाईमुळे आधीच हैराण झालेला असतानाच सर्वसामान्य नागरिकांना आणखी एक झटका लागला आहे. पुन्हा एकदा घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. बुधवारी म्हणजेच, 6 ऑक्टोबर रोजी विनाअनुदानित सिलेंडरच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली. 15 रुपयांची वाढ विनाअनुदानित 14.2 किलोंच्या सिलेंडरवर करण्यात आली आहे. दिल्लीत विनाअनुदानित सिलेंडरची किंमत दरवाढीनंतर 899 रुपये झाली आहे. तर 5 किलोंच्या सिलेंडरची किंमत 502 रुपये झाली आहे.

विनाअनुदानित घरगुती एलपीएजी सिलेंडरची किंमत दिल्ली-मुंबईमध्ये 884.50 रुपयांवरुन आता 899.50 रुपयांवर पोहोचली आहे. तर पटनामध्ये आता एलपीजी सिलेंडरची किंमत हजार रुपयांच्या आसपास पोहोचली आहे. याच वर्षात 1 जानेवारी रोजी गॅस सिलेंडर 694 रुपयांना मिळत होता. 1 सप्टेंबर रोजी 884 रुपये एवढी किंमत होती. 17 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरमध्ये 15 दिवसांत 50 रुपयांनी दरवाढ झाली. म्हणजेच, 8 महिन्यांमध्ये 190 रुपयांनी सिलेंडर महाग झाला आहे.