लवकरच मिळणार ‘मेड इन स्पेस’ वस्तू

मेड इन इंडिया, मेड इन चायना अशी लेबल, खरेदी केलेल्या अनेक वस्तूंवर वाचायची सवय पडलेल्या ग्राहकांना आता लवकरच ‘मेड इन स्पेस’ लिहिलेल्या वस्तू दिसल्या तर हैराण होण्याचे कारण नाही. भविष्यात अश्या वस्तू मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून ब्रिटन अंतराळात एक उत्पादन कारखाना सुरु करण्याच्या तयारीत आहे. आपल्या वापरात असलेली अनेक उत्पादने या कारखान्यात तयार केली जाणार आहेत.

वैज्ञानिक या अंतराळ कारखान्यात हायपरफॉर्मन्स उत्पादने बनविणार आहेत. गुरुत्वाकर्षण नसलेल्या परिस्थितीचाच यासाठी वापर केला जाणार आहे. या परिस्थितीत पृथ्वीवर वस्तू बनविणे शक्य नाही. ‘स्पेस फोर्ज’ नावाची कंपनी रोबो फोर्जस्टार ऑर्बीटल व्हेईकल त्यासाठी अंतराळात पाठविणार आहे. हे वाहन ओव्हनच्या आकाराचे असेल.

अंतराळात पृथ्वीपासून ३०० ते ५० मैलावर हे स्थापित केले जाणार असून ऑटोमॅटीक पद्धतीने हाय परफॉर्मन्स वस्तू तेथे बनविल्या जातील. सेमी कंडक्टर, मिश्र धातू आणि फार्मा उत्पादने यांचा त्यात समावेश असेल. अंतराळात बनलेले सेमी कंडक्टर पृथ्वीवर बनलेल्या सेमी कंडक्टर पेक्षा चांगल्या प्रतीचे आणि उर्जेचा कमी वापर करणारे असतील असे समजते.