या कंपनीला छोटीशी चूक पडली ६५० कोटींना

क्रिप्टोकरन्सी विकणाऱ्या एका कंपनीला एक बारीकशी तांत्रिक चूक चांगलीच महागात पडली आहे आणि कंपनीच्या सीईओला त्यामुळे आपल्या ग्राहकांची मनधरणी करण्याची पाळी आली आहे. सीबीएस न्यूज मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार ‘कंपाउंड’ नावाचा हा प्रसिद्ध क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्म एका तांत्रिक चुकीने अडचणीत आला. ही कंपनी क्रिप्टोकरन्सी विकण्याचे काम करते. सोफ्टवेअर सिस्टीम मध्ये शिरलेल्या एका बगमुळे युजर्सच्या खात्यात ९० दशलक्ष डॉलर्स म्हणजे ६५० कोटी रुपये जमा झाल्याची घटना येथे घडली. गुंतवणूक न करताच खात्यात जमा झालेली रक्कम पाहून ग्राहक आनंदित झाले पण सीईओ रॉबर्ट लेशनर यांच्या पायाखालची जमीन सरकली.

लेशनर यांनी झालेली गडबड लक्षात येताच त्वरित ट्विटरवरून ग्राहकांना निवेदन केले. ‘ जर तुमच्या खात्यात कंपाउंड प्रोटोकॉल त्रुटीमुळे मोठी रक्कम जमा झालेली दिसली तर कृपया कंपाउंड टाईमलॉक मध्ये परत करा’ असे आवाहन करताना त्यांनी ग्राहकांना रेव्हेन्यू सर्विस रिपोर्ट केला जाईल असेही कळविले आहे.

डीसेंट्रलाइज्ड फायनान्स प्लॅटफॉर्म कंपाउंड अपडेट मध्ये एक तांत्रिक चूक झाल्याने हा प्रसंग ओढवला असे स्पष्ट केले गेले आहे. गेले काही दिवस भारतात सुद्धा क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करण्याची क्रेझ वाढत चालली आहे. तीन वर्षापूर्वी रिझर्व्ह बँकेने क्रिप्टोकरन्सीवर बंदी घातली होती मात्र गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने ती उठविली आहे आणि तेव्हापासून या करन्सी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत भारतात लक्षणीय वाढ झाली आहे असेही समजते.