यासाठी आहे निळे आधार कार्ड

आधारकार्ड हे प्रत्येक भारतीयासाठी आवश्यक आणि महत्वाचे दस्तावेज आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक सेवांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड हवे तसेच संबंधित व्यक्तीचे ओळखपत्र म्हणून सुद्धा ते महत्वाचे आहे. अनेक संस्थाशी संबंधित कामे करताना आधार कार्ड द्यावे लागते. आपल्याला साधारण एकच प्रकारचे आधार कार्ड माहिती आहे पण आणखीही एका प्रकारचे आधारकार्ड आहे त्याची माहिती अनेकांना नाही.

हे आधारकार्ड निळ्या रंगाचे असून त्याला बाल आधार कार्ड म्हटले जाते. पाच वर्षाखालील बालकांसाठी असे आधार कार्ड बनविले जाते. यात फिंगरप्रिंट, आईरीस स्कॅन अश्या बायो माहितीची गरज नसते. पण पाच वर्षे पूर्ण झाल्यावर मात्र हे कार्ड अपडेट करून घ्यावे लागते.

यासाठी आपण जसा आधारकार्ड मिळविण्याचा फॉर्म भरतो त्याचप्रकारे अर्ज द्यावा लागतो. त्यात सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. राहण्याचे ठिकाण, नाते पुरावा, जन्मतारीख अशी कागदपत्रे द्यावी लागतात. आधार कार्ड तयार झाले की घरपोच पाठविले जाते.