फेसबुक ठप्प करण्यामागे ‘थॉमस हॅकर’ ?

काही काळासाठी एकचवेळी बंद पडलेल्या फेसबुक, व्हॉटस अप आणि इन्स्टाग्राम सेवा विस्कळीत होण्यामागे बडा सायबर गुन्हेगार ‘ थॉमस’ याचा हात असावा अशी शक्यता आहे. या संदर्भात एफबीआयचे सायबर क्राईम अधिकारी जॉन मेक्लेन यांच्यावर तपासाची जबाबदारी सोपविली गेली असल्याचे वृत्त आहे. थॉमस हॅकरमुळे यापूर्वीही अनेकांना त्रास झाला आहे. यापूर्वी सुद्धा फेसबुक आणि या अन्य सेवा बंद पडण्याच्या घटना घडल्या आहेत मात्र हा दोष तास दोन तासात दूर केला गेला होता. एकच वेळी या तिन्ही सेवा सहा सात तास बंद पडण्याची घटना प्रथमच घडली आहे.

सोमवारी रात्री ९ नंतर सुमारे सहा सात तासासाठी अचानक ठप्प झालेल्या फेसबुक, व्हॉटस अप आणि इन्स्टाग्राम सेवांमुळे जगभरातील युजर्स हैराण झाले आणि त्यांना मोठी गैरसोय सोसावी लागली या बद्दल फेसबुक कडून युजर्सची माफी मागितली गेली असली तरी ही सेवा ठप्प नक्की का झाली याचा स्पष्ट खुलासा झालेला नाही.

फेसबुकने डोमेन नेम सिस्टीम मधील त्रुटी मुळे हा प्रकार घडला असे म्हटले आहे. या सिस्टीमला डीएनएस म्हणतात. हे इंटरनेट साठीचे जणू फोन बुक असते. हे असे टूल आहे जे कोणत्याही वेबसाईटच्या वेब डोमेनला इंटरनेट प्रोटोकॉल व आयपी नुसार वेबसाईट अॅड्रेस रुपात व्यवस्थित काम करते. फेसबुकच्या या डीएनएस मध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने या सेवा बंद पडल्या असे सांगितले गेले असले तरी थॉमस हॅकरचे नाव आल्याने युजर्स आपला डेटा हॅक तर झाला नसेल ना या चिंतेत पडले आहेत. फेसबुकने मात्र कोणाचाही डेटा हॅक झाल्याचा इन्कार केला आहे.