नरेंद्र मोदींचे पुन्हा एकदा दिवे लावण्याचे चॅलेंज


नवी दिल्ली – मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घरांमध्ये दिवा लावण्याचे आवाहन केले होते. मोदींनी आता त्याचद्धतीचे आवाहन पुन्हा एकदा केले असून यंदा १८ लाख दिवे लावण्यासंदर्भातील शब्द मोदींनी उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे मिळालेल्या लाभार्थ्यांकडून घेतला आहे. नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये बोलताना केंद्र सरकारसोबतच उत्तर प्रदेशमधील योगी सरकारच्या कामाचे तोंडभरुन कौतुक करताना कामांचा पाढा वाचतानाच दिवाळीमध्ये घरी दोन दिवे लावा, असे आवाहन केले आहे.

मोदींनी केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडताना, अयोध्येमध्ये यंदा दिवाळीत साडेसात लाख दिवे लावणार असल्याची माहिती मला आता देण्यात आली. उत्तर प्रदेशला मी आवाहन करतो की राज्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ज्यांना ज्यांना घरे मिळाली आहेत, त्या ९ लाख लाभार्थ्यांनी आपआपल्या घरांमध्ये प्रत्येकी दोन दिवे लावावेत. म्हणजे अयोध्येमध्ये साडेसात लाख दिवे लागतील, तेव्हा या घरांमध्ये १८ लाख दिवे लावले जातील. भगवान रामालाही याचा आनंद होईल, असेही मोदी म्हणाले.

मोदींनी यावेळी आम्ही या घरांच्या योजनांमध्ये फार सकारात्मक बदल केल्याचेही सांगितले. जे सरकार २०१४ च्या आधी होते, त्यांनी शहरांमधील योजनांमध्ये केवळ १३ लाख घरे मंजूर केली. त्यापैकी ८ लाख घरे बनवण्यात आली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १ कोटी १३ लाखांहून अधिक घरांच्या उभारणीसाठी परवानगी दिली. ५० लाख घरे देण्यात आली. आम्ही घरांच्या डिझाइनपासून निर्मितीपर्यंत सर्व गोष्ट घरं वापरणाऱ्यांना ठरवायला सांगितले. दिल्लीत एसी कार्यालयांमध्ये बसून आम्ही निर्णय घेतले नसल्याचे मोदी म्हणाले.

घरे किती मोठी असतील याचा निर्णय आम्ही घेतला. २२ स्वेअर मीटरपेक्षा छोटे घर असणार नाही, असे आम्ही ठरवले. आम्ही थेट गरिबांना त्यांच्या खात्यांवर घर बनवण्यासाठी पैसे पाठवले. केंद्राने जवळजवळ १ लाख कोटी रुपये गरिबांच्या खात्यांवर थेट पाठवले. आपल्याकडे काहीजण म्हणतात की मोदींनी काय केले. पहिल्यांदाच मी तुम्हाला असे काही सांगू इच्छितो की माझे जे सहकारी आहेत, जे झोपड्यांमध्ये राहत होते, ज्यांच्याकडे पक्के घर नव्हते, अशा ३ कोटी घरांना या कार्यकाळामध्ये एकाच योजनेने लखपती होण्याची संधी मिळाली, असेही मोदींनी नमूद केले.

देशात २५ ते ३० कोटी अशी कुटुंब आहेत, ज्यातील तीन कोटी कुटुंब लखतपी झाले आहेत. मला ते दिवसही आठवतात जेव्हा फार प्रयत्न करुनही उत्तर प्रदेश घर बनवण्यामध्ये पुढे जात नव्हता. गरिबांना घर बांधण्यासाठी केंद्र पैसे देत होते. योगी सरकार येण्याआधी जे सरकार होते त्यांना गरिबांसाठी घरे बनवायची नव्हती. आधी जे होते त्यांच्याकडे आम्हाला विनंती करावी लागायची, असे म्हणत मोदींनी आधीच्या सरकारवर टीका केली.

आम्ही २०१७ आधी युपीसाठी १८ हजार घरे निश्चित केली. पण येथील सरकारने १८ घरे सुद्धा बनवून दिली नाही. पैसा होता, परवानगी होती, पण जे सत्तेत होते, ते नेहमीच कामाच्या आड यायचे. त्यांचे हे कृत्य येथील लोक विसरणार नाही. योगी सरकार सत्तेत आल्यानंतर शहरांमधील ९ लाख गरिबांना घरे बांधून देण्यात आली. १४ लाख घरांचे बांधकाम सुरु आहे. वीज, पाणी, गॅस, शौचालय अशा सेवाही दिल्या जात असल्याचेही मोदींनी सांगितले.