नकारात्मक कारणांसाठी नरेंद्र मोदींचा जगातील सर्वात प्रभावशाली १०० व्यक्तींमध्ये समावेश


‘२०२१ मधील सर्वात प्रभावशाली १०० व्यक्तीं’च्या अमेरिकेमधील ‘टाइम’ या जगप्रसिद्ध मॅगझिनच्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश करण्यात आला आहे. पण मोदींचा हा समावेश नकारात्मक कारणांसाठी करण्यात आला आहे. या यादीमध्ये मोदींचा उल्लेख ज्या पार्श्वभूमीवर करण्यात आला आहे, तो उल्लेख मान उंचवणारा नसून देशाच्या प्रतिमेसंदर्भात शंका घेणार आहे.

‘२०२१ मधील सर्वात प्रभावशाली १०० व्यक्ती’ या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख ‘भारताला धर्मनिरपेक्षतेपासून दूर लोटणारे आणि हिंदू राष्ट्रवादाकडे ढकलणारे नेते’ असा करण्यात आला आहे. तसेच भारतामधील मुस्लिमांच्या अधिकारांमध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील राजवटीमध्ये कपात करण्यात आल्याचा आरोपही या लेखात करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या कार्याचा आढावा घेणार लेख भारतीय वंशाचे पत्रकार फरीद झकरिया यांनी लिहिला आहे. आपल्या लेखामध्ये ते लिहितात, पंतप्रधान मोदींनी पत्रकारांना घाबरवले, धमकावले आणि तुरुंगांमध्ये टाकले. त्यांनी असे कायदे आणले ज्यामुळे भारतामधील हजारो बिगरसरकारी संस्था आणि गट कमकुवत झाले.

जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर भारतासाठी पंतप्रधान मोदी हे सर्वात महत्वाचे नेते असल्याचे झकरिया यांनी म्हटले आहे. भारतासाठी जवाहरलाल नेहरु यांनी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीचा मूलभूत साचा तयार केला. सर्वात कठीण काळामध्ये इंदिरा गांधी या सुद्धा सत्तेत होत्या. त्यांच्या काळात झालेली युद्ध, नागरिक आंदोलने आणि आणीबाणी अशा महत्वाच्या घडामोडी घडल्या. या दोघांनंतर सर्वाधिक प्रभावशाली नेते पंतप्रधान मोदीच असल्याचा उल्लेख या लेखामध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा यापूर्वीही टाइम्सच्या या यादीत समावेश करण्यात आलेला होता.

आर्थिक निकषांच्या आधारे भारताला कॅपिटलिस्ट म्हणजेच आर्थिक उलाढाली केंद्रस्थानी ठेऊन पंतप्रधान मोदींनी निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. भारताला त्यांनी कॅपिटलिझमकडे ढकलण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला आहे. पण त्यांनी त्याचप्रमाणे देशाला धर्मनिरपेक्षतेपासून दूर लोटत हिंदू राष्ट्रवादाकडे ढकलले असल्याचे लेखात म्हटले आहे.

करोना परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यात आणि नियोजनामध्ये अपयश आल्यानंतरही मोदींची लोकप्रियता कायम असल्याचा उल्लेख लेखात आहे. अधिकृत आकडेवारीपेक्षा मृतांचा आकडा हा फार अधिक असण्याची शक्यता असल्याचेही लेखकाने म्हटले आहे.

या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच अन्य दोन भारतीय व्यक्तींचा समावेश असून त्यांचा उल्लेख सकारात्मक पद्धतीने करण्यात आला आहे. १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि कोव्हिशिल्ड ही कोरोना प्रतिरोधक लस बनवणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांचाही समावेश आहे.