काल दिवसभरात देशात 18 हजार 346 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 263 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशावर ओढावलेली कोरोना महामारी आता काहीशा प्रमाणात कमी झाल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून पहायला मिळत आहे. दरम्यान काल दिवसभरात 18 हजार 346 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 263 बाधितांनी आपले प्राण गमावले आहेत. यात विशेष बाब म्हणजे, 209 दिवसांनंतर देशात आज सर्वात कमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल दिवसभरात 29 हजार 639 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यानंतर देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होऊन 2 लाख 52 हजार 902 एवढी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत तीन कोटी 38 लाख 53 हजार 48 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यापैकी आतापर्यंत चार लाख 49 हजार 260 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 31 लाख 50 हजार 886 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकडेवारीत घट पाहायला मिळत आहे. राज्यात काल दिवसभरात 2,026 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 389 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत राज्यात 63 लाख 86 हजार 059 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.27 टक्के आहे.

तसेच राज्यात काल दिवसभरात 26 बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असल्यामुळे राज्याचा डेथरेट 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 839 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात सध्या 33 हजार 637 बाधितांवर उपचार सुरु आहेत. आर्थिक राजधानी मुंबईत काल दिवसभरात 341 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 520 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,21,571 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत काल दिवसभरात दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4532 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1154 दिवसांवर गेला आहे.