चीनने जगाला कोरोनाची माहिती देण्यापूर्वीच सुरु केल्या होत्या कोरोना चाचण्या


सिडनी – डिसेंबर २०१९ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) वुहानमधील चिनी प्रयोगशाळांनी पहिल्या कोरोनाबाधिताची माहिती देण्यापूर्वी कित्येक महिने आधी कोरोना चाचणीची उपकरणे खरेदी केली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवीन अहवालाच्या निष्कर्षांनुसार, कोरोना आजार जाहीर केल्याच्या काही महिन्यांपूर्वी चीनी सरकारने देशातील हुबेई प्रांतात कोरोना चाचण्यांवरील खर्च वाढवला होता. या आठवड्यात ऑस्ट्रेलियाच्या सायबर सुरक्षा कंपनी इंटरनेट २.० ने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

२०१९ मध्ये गेल्या वर्षापेक्षा कोरोना चाचण्यांसाठी वापरण्यात आलेल्या पॉलिमरेझ चेन रिअॅक्शन चाचणीवर जवळपास तीन पटीने अधिक खर्च चीन सरकारने केला होता. कोरोनाचे पहिले प्रकरण हुबेई प्रांतातील वुहान शहरात नोंदवले गेले होते. चीनने ३१ डिसेंबर २०१९ मध्ये शहरात अज्ञात कारणामुळे न्यूमोनियाची प्रकरणे आढळल्याचे जागतिक आरोग्य संघटनेला कळवले होते.

७ जानेवारी २०२० रोजी, एक नवीन प्रकारचा कोरोना व्हायरसची माहिती चिनी अधिकाऱ्यांनी देत त्याला SARS-CoV-२ म्हणून ओळखले जाईल आणि त्यामुळे कोरोना नावाचा आजार होऊ शकतो, असे म्हटले होते. त्यानंतर कोरोना हा जवळजवळ जगभरातील प्रत्येक देशात पसरला आहे आणि २३० दशलक्षाहून अधिक लोकांना बाध झाली आणि जवळपास ४.८ दशलक्ष लोक मरण पावले आहेत.

इंटरनेट २.० ने संशोधनाच्या आधारावर निष्कर्ष काढला की चीनने जागतिक आरोग्य संघटनेला कोरोना बद्दल माहिती देण्यापूर्वीच ही महामारी सुरू झाली होती. डिजिटल फॉरेन्सिक्स आणि इंटेलिजन्स विश्लेषणामध्ये तज्ज्ञ असलेल्या सायबर सिक्युरिटी फर्मने पुढील तपास करत आहेत.

पण अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी असे म्हटले आहे की असे निष्कर्ष इंटरनेट २.० अहवालातून काढण्यासाठी पुरेशी माहिती नाही. कारण अनेक दशकांपासून व्यापक वापरात असलेली पीसीआर चाचणी लोकप्रिय आहे. ही चाचणी चाचणीसाठी एक मानक पद्धत बनली आहे, असे एका तज्ज्ञाने म्हटले आहे. याव्यतिरिक्त, प्राण्यांसह, कोरोना व्यतिरिक्त इतर रोगजनकांच्या चाचणीसाठी प्रयोगशाळांमध्ये पीसीआर उपकरणे मोठ्या प्रमाणावर वापरली जातात आणि ती सामान्यतः आधुनिक रुग्णालये आणि प्रयोगशाळांमध्ये आढळतात.