संघ आणि अमित शहांचे दिग्विजय सिंह यांच्याकडून कौतुक


भोपाळ – बुधवारी एका जाहीर कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचा मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसचे वरिष्ठ नेते, राज्यसभेचे खासदार आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी केलेले भाषण सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे त्यांनी एका सभेसमोर आपल्या भाषणामध्ये आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केले.

विरोधी विचारसणीच्या संस्थेचे आणि व्यक्तीचे नेहमी संघ आणि भाजपवर टीका करणाऱ्या सिंह यांच्या तोंडून कौतुक ऐकताना अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. राजधानीचे शहर असणाऱ्या भोपाळमध्ये नमर्दा परिक्रमेवर आधारित एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. सिंह यांनी याच कार्यक्रमामध्ये बोलताना आरएसएस आणि शहा यांचे कौतुक केले. संघ आणि भाजपने आपल्या नर्मदा परिक्रमेच्या दौऱ्यादरम्यान दिलेल्या पाठिंब्यासाठी त्यांनी हे कौतुक केले असल्याचे वृत्त न्यूज १८ ने दिले आहे.

दिग्विजय सिंह यांनी या कार्यक्रमामध्ये आपल्या नर्मदा परिक्रमा यात्रेदरम्यानेच अनुभव सांगितले. त्यावेळी त्यांनी त्यांची यात्रा गुजरातमधून जात होती, तेव्हा अमित शहा यांनी वन अधिकाऱ्यांना सूचना करत शासकीय विश्रामगृहामध्ये आमच्या राहण्याची सोय केली होती, अशी आठवण सांगितली. आपण अमित शहा यांचे सर्वात मोठे टीकाकार असल्याचेही दिग्विजय सिंह यांनी सांगितले. असे असतानाही त्यांनी वन अधिकाऱ्यांशी बोलून माझ्या यात्रेमध्ये कोणतेही विघ्न येऊ नये, यासंदर्भातील काळजी घेतली. मी कधी शहा यांना समोरासमोर भेटलेलो नाही. मात्र मी यासाठी अमित शहा यांना धन्यवादचा संदेश नक्कीच पाठवलेला. राजकीय सामंजस्य कसे असावे याचे हे उदाहरण आहे. अनेकदा आपल्यापैकी अनेकांना याचा विसर पडतो, असे दिग्विजय सिंह म्हणाले.

संघाबद्दल बोलताना माजी मुख्यमंत्री राहिलेल्या दिग्विजय सिंह यांनी, संघ आणि माझे विचार सारखे नाहीत. पण संघाचे लोक या यात्रेदरम्यान मला भेटायला येत होते. संघाच्या कार्यकर्त्यांना माझी भेट घेण्यासंदर्भात वरुन आदेश दिले जात होते. त्यांच्याकडून माझ्या राहण्या खाण्याची व्यस्था केली जात होती. संघाचे लोक कष्ट करतात, पण त्यांच्या देश वाटण्याच्या गोष्टींचे मी समर्थन करत नाही म्हणून आमचा वैचारिक विरोध कायम असल्याचे दिग्विजय सिंह म्हणाले.