असे आहेत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल अधिकारी समीर वानखेडे

गेल्या वर्षी सुशांतसिंग राजपूतच्या संशयास्पद मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती आणि तिच्या काही साथीदारांना अमली पदार्थ विरोधी कायद्याखाली अटक केल्यापासून समीर वानखेडे हे नाव सातत्याने चर्चेत राहिले आहे. एनसीबी ब्युरोच्या मुंबई विभागाचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे शनिवारी मुंबई गोवा क्रुझ शिपवर सुरु असलेल्या रेव पार्टीतून बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याला अटक केल्यापासून पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई गोवा क्रुझवर रेव पार्टी होणार असल्याची खबर वानखेडे याना दोन आठवडे अगोदरच मिळाली होती आणि ही माहिती खात्रीलायक आहे याची खात्री पटल्यावर वानखेडे त्यांच्या २२ जणांच्या टीम सह प्रवासी म्हणून या क्रुझवर चढले होते. यातील दोन अधिकारी आर्यन खान आणि त्याच्या ग्रुपवर नजर ठेउनच होते. संशयास्पद हालचाली दिसताच या टीमने आर्यन सह आठ जणांना ताब्यात घेतले. वानखडे यांच्या चतुराईची आणि कौशल्याची ही पहिली केस नाही. रिया चक्रवर्तीच्या केस पासून वानखेडे अधिक प्रकाशात आले असले तरी त्यापूर्वी सुद्धा त्यांनी नार्कोटिक्स कायद्यानुसार अनेक ड्रग पेडलर्सना ताब्यात घेतले आहे.

सुशांत केस मध्ये सुद्धा गोरेगाव स्टेशनजवळ मेंडीस हा ड्रग पेड्लर एलएसडी विकत असल्याची खबर मिळताच वानखेडे यांनी टीम सह तेथे धाव घेतली होती. पण पोलीस आल्याची खबर मिळताच मेंडीसने आरडाओरड सुरु केली आणि आसपासच्या लोकांनी पोलिसांवर हल्ला चढविला त्यात वानखेडे जखमी झाले होते पण तोपर्यंत त्यांनी मेंडीसला पकडून गाडीत चढविले होते.

समीर वानखेडे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती आहेत आणि २००८ सालाचे भारतीय राजस्व सेवेचे (आयआरएस) प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांचे पाहिले पोस्टिंग मुंबई विमानतळावर होते तेव्हा त्यांनी कस्टम ड्युटी चुकवून वस्तू आणणाऱ्या अनेक सेलेब्रिटीना अडकविले होते. त्यात अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय, मिका सिंग, रामगोपाल वर्मा अश्या अनेकांचा समावेश होता. २०११ मध्ये टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकून ट्रॉफी सह भारतात परतली तेव्हाही त्यांनी सुवर्ण ट्रॉफी असल्याने त्यावरची कस्टम ड्युटी भरल्यावरच ट्रॉफी सह विमानतळाबाहेर जाण्यास टीमला परवानगी दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार त्या दोन वर्षाच्या काळात वानखेडे यांनी सुमारे २ हजार सेलेब्रिटीना कस्टम ड्युटी भरून मगच बाहेर पडण्याची परवानगी दिली होती. गेल्या दोन वर्षात त्यांनी १७ हजार कोटींचे अमली पदार्थ वेळोवेळी घातलेल्या धाडीतून जप्त केले आहेत.