अमली पदार्थ प्रकरणात मृत्यूदंडापर्यंत दिल्या जातात शिक्षा

शाहरुख पुत्र आर्यन आणि त्याच्या मित्रमैत्रिणीना देशातील नार्कोटिक्स ब्युरो कडून अटक झाल्यानंतर युवा पिढीत अश्या नशेचे वाढत चाललेले प्रमाण पुन्हा चर्चेत आले आहे त्याचबरोबर आशियातील अन्य देशात अश्या अपराधासाठी कोणत्या शिक्षा आहेत याचा सर्च मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून आले आहे.

भारतात सुद्धा अमली पदार्थ बाळगणे, विकणे यासाठी अनेक प्रकारच्या शिक्षा कायद्याने लागू आहेत मात्र अनेकवेळा अश्या गुन्ह्यात न्यायालयात केस निकाली निघायला बराच काळ जातो आणि त्यामुळे गुन्हेगारांना शिक्षा मिळण्यास सुद्धा विलंब होतो असे दिसून आले आहे. आशियाई देशातून सुद्धा अमली पदार्थ संदर्भातील गुन्ह्यांसाठी कडक शिक्षेची तरतूद आहे. या शिक्षा भक्कम दंड, तुरुंगवास आणि अगदी मृत्युदंड किंवा फाशी या स्वरूपाच्या आहेत.

मलेशिया मध्ये अमली पदार्थ बाळगणे, विकणे आणि सेवन अश्या विविध कारणांनी भक्कम दंड, तुरुंगवास आणि देशातून बाहेर काढणे अश्या शिक्षा आहेत. दारू पिऊन गाडी चालविल्यास सुद्धा कडक शिक्षा होते. इराण मध्ये सुद्धा कडक शिक्षा आहेत. येथे अफूसेवन ही मोठी समस्या आहे कारण अफू उत्पादन करणारा अफगाणिस्थान त्यांचा शेजारी देश आहे. येथे अफू किंवा अन्य अमली पदार्थासह कुणाला पकडले गेले तर मोठा दंड ते मृत्युदंड या श्रेणीत शिक्षा दिली जाते.

उत्तर कोरिया मध्ये पर्यटक फारसे जात नाहीत कारण तेथे बाहेरच्या देशातून येण्यास मुळात परवानगी नाही. पण समजा कुणी अमली पदार्थासह सापडला तर त्याला दीर्घकाळ एकांतवासात ठेवले जाते. मित्र, परिवारातील कुणालाही भेटू दिले जात नाही. चीनमध्ये अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण अश्या लोकांना सरकार नशा मुक्ती केंद्रात भरती करते असे समजते. काही केसेस मध्ये मृत्यूदंड दिला जातो. तुर्कस्तानात भक्कम दंड आणि दीर्घकाळ तुरुंगवास तर व्हिएतनाम मध्ये हा गंभीर गुन्हा मानला जातो. १.३ पौंड पेक्षा अधिक वजनाचे हेरॉईन सापडले तर फासावर लटकावले जाते.