५-६ ऑक्टोबरला मुंबईमधील ‘या’ भागातील पाणीपुरवठा पूर्णतः राहणार बंद


मुंबई – एक महत्त्वाची बातमी मुंबईकरांसाठी असून पुढील काही तासांसाठी शहरातील काही प्रभागांमध्ये संपूर्ण पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या म्हणजेच ५ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबरदरम्यान परळच्या काही भागात पाणी पुरवठा पूर्णपणे खंडित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. महापालिकेच्या एफ दक्षिण प्रभागातील परळ, काळेवाडी, नायगाव भागाचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी या वेळेत काही तांत्रिक कामे हाती घेण्यात येणार असल्यामुळे, यादरम्यान पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल.

मुंबईकरांना पाणी जपून वापण्याचे आवाहन बृहन्मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. मंगळवार ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजपासून ते बुधवार ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत परळच्या काही भागातील पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

पाणीपुरवठा ज्या वेळेत बंद असेल त्या वेळेत गोलंजी टेकडी जलाशयाच्या आतील परिसरातील ७५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीची व ४५० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीची जोडणी करण्यात येणार आहे. तर एफ दक्षिण विभागात पाणी पुरवठा करणाऱ्या ४५० मिलीमीटर व्यासाच्या २ जलवाहिन्या काढून टाकण्यात करण्यात येणार असल्यामुळे या भागातील पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेने दिली आहे.