लखीमपूरला जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियंका गांधींना केली अटक


लखनऊ : केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमध्ये रविवारी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना लखीमपूर खेरी या ठिकाणी भेटायला जाणाऱ्या काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांना अटक केल्याची माहिती युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांनी दिली आहे.

यासदंर्भात केलेल्या आपल्या ट्वीटमध्ये युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांनी म्हटले आहे की, जे अपेक्षित भाजपकडून होते शेवटी तेच घडले. महात्मा गांधींच्या लोकशाहीवादी देशात गोडसेच्या भक्तांनी भर पावसात आणि पोलिसांशी संघर्ष करत शेतकऱ्यांच्या भेटीला जाणाऱ्या आमच्या नेत्या प्रियंका गांधी यांना हरगाव मधून अटक केली आहे. मोठ्या लढाईची ही तर केवळ सुरुवात आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आशिष मिश्रावर शेतकऱ्यांच्या दबावामुळे हत्या, गैरव्यवहार, दुर्घटना करण्याचा हेतू अशा विविध आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

शेतकरी नेते राकेश टिकेत आज पहाटे साडे चार वाजता लखीमपूर या ठिकाणी पोहोचले असून त्यांनी शेतकऱ्यांची एक बैठक घेतली. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि त्यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी, अशी मागणी या बैठकीत केली आहे. जोपर्यंत या दोघांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृत शेतकऱ्यांचे अंतिम संस्कार केले जाणार नसल्याचा इशारा राकेश टिकेत यांनी दिला आहे.

एका कार्यक्रमानिमित्ताने केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा हे लखीमपूर खेरी या ठिकाणी येणार होते. पण त्याआधीच केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले. ज्यावेळी केंद्रीय मंत्र्यांचा गाडीचा ताफा या ठिकाणी आला त्यावेळी आशिष मिश्राने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.