अग्रलेख लिहून जे नेते होतात त्यांना शेतकऱ्यांचे दुःख काय माहीत; संजय राऊतांना देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर


लातूर : राज्यातील शेतकरी विशेषत: मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे अडचणीत सापडला आहे. यानंतर आता राजकीय नेत्यांचे दौरे सुरु झाले असून सध्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. शिवसेनेने त्यांच्यावर यावरुन जोरदार टीका केली आहे. फडणवीस यांनी लातूरमध्ये या टीकेला उत्तर दिलं आहे. ऑफिसमध्ये जे लोक बसून टीका करतात, अग्रलेख लिहून जे नेते होतात, त्यांना शेतकऱ्यांचे दुःख काय माहीत. हे ऑफिसमधील लीडर आहेत, हे कागदावरचे लीडर आहेत त्यांना काय उत्तर द्यायचे, अशा शब्दात फडणवीसांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.

फडणवीस पुढे म्हणाले की, मराठवाडा विरोधी हे सरकार असून मुख्यमंत्र्यांना पूरग्रस्त भागाचा दौरा करायचा असेल, तर आताच करावा अन्यथा मुंबईतून मदतीची घोषणा करावी. मुख्यमंत्री सोडा पालकमंत्री देखील दौऱ्यावर गेलेले नाहीत. विदर्भ मराठवाड्यावर सरकारकडून अन्याय होत आहे. तसेच त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी, अशी मागणीही केली आहे. धरणातून तेरा टीएमसी पाणी सोडल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आणि लोकांच्या शेतामध्ये पाणी गेले आहे. हजारो एकर शेतीचे नुकसान झाले, याची चौकशी झाली पाहिजे. पाणी किती वेगाने सोडले पाहिजे, कसे सोडले पाहिजे यासंदर्भात SOP तयार झाली पाहिजे. सरकार शेतकऱ्याला न्याय देणार नसेल, तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि सरकारच्या विरोधात आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

फडणवीस म्हणाले की, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात मुख्यमंत्री तर सोडाच पण पालकमंत्रीही फिरकले नाहीत. मुख्यमंत्र्यांना दौरा करायचा असेल तर त्यांनी तात्काळ करावा. मुख्यमंत्र्यांना यायचे नसेल, तर येऊ नये पण शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्यावे. या सरकारमध्ये संवेदना उरली नाही. पालकमंत्री सुद्धा जिल्ह्यामध्ये येत नाहीत. या सरकारला वैधानिक विकास मंडळाची हत्या केली. मुख्यमंत्री कोकणात जात असतील पश्चिम महाराष्ट्रात जात असतील तर ते मराठवाड्यात का येत नाहीत असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर सरकारनं कागदावरचे पॅकेज नाही, तर ते शेतकऱ्यांसाठी पॅकेज घोषित करावे, असे ते म्हणाले.