झायडस कॅडिलाच्या लसीसाठी १९०० रुपये किंमत प्रस्तावित


नवी दिल्ली : केंद्र सरकार व झायडस कॅडिला कंपनी यांची ‘झायकोव्ह-डी’ या कोरोना प्रतिबंधक लशीच्या किमतीबाबत चर्चा सुरू असतानाच, तीन मात्रांच्या या लशीसाठी १९०० रुपये अशी किंमत या कंपनीने सुचवल्याचे कळते. तथापि, सरकार ही किंमत कमी करण्याबाबत वाटाघाटी करत असून, या आठवडय़ात याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

झायडस कॅडिलाच्या पहिल्या डीएनएवर आधारित सुईविरहित कोरोना प्रतिबंधक लसीचा लवकरच देशव्यापी लसीकरण मोहिमेत समावेश केला जाईल, असे सरकारने सांगितले होते. तीन मात्रांच्या या लसीसाठी कंपनीने सर्व करांसह १९०० रुपयांची किंमत प्रस्तावित केली आहे. लशीच्या किमतीबाबत सर्व पैलूंचा फेरविचार करण्यास कंपनीला सांगण्यात आले असून, त्याबाबत अंतिम निर्णय या आठवडयात होईल, असे एका सूत्राने सांगितले.

झायकोव्ह-डी ची किंमत कोव्हॅक्सिन व कोव्हिशिल्ड या लसींपेक्षा वेगळी असणे साहजिक आहे. कारण ३ मात्रांची लस असण्याशिवाय, ही लस देण्यासाठी सुईविरहित जेट इंजेक्टरची गरज असून त्याची किंमत ३० हजार रुपये आहे, असे दुसऱ्या सूत्राने सांगितले. एक जेट इंजेक्टर सुमारे २० हजार मात्रा देण्यासाठी वापरले जाऊ शकते. ही लस शून्य, २८ व ५६ व्या दिवशी दिली जायची असते.