दिलासादायक! देशातील सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.89 टक्क्यांवर


नवी दिल्ली : देशात काल दिवसभरात 20 हजार 799 कोरोनाबाधितांची नोंद केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार करण्यात आली आहे, तर 180 बाधितांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच काल दिवसभरात देशातील 26 हजार 718 बाधितांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. विशेष म्हणजे देशातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या घटली असून ती 0.78 टक्के एवढी कमी झाली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही गेल्या दीड वर्षातील सर्वाधिक म्हणजे 97.89 एवढे झाले आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील कोरोनाची दुसरी लाट आता आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. काल दिवसभरात राज्यात 2,692 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 716 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 63 लाख 80 हजार 670 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.28 टक्के आहे. दरम्यान, कोरोना नियंत्रणात आल्यामुळे आजपासून राज्यातील शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.