आईन्स्टाईनने पाहिले होते एलियन्स आणि युएफओ !
परग्रहवासी, उडत्या तबकड्या, स्पेस मिशन या विषयातील चित्रविचित्र घटना नेहमीच चर्चेत असतात. उडत्या तबकड्या म्हणजे युएफओ पहिल्याचे अनेक दावे वेळोवेळी केले गेले आहेत पण त्यातील खरे खोटे किती हे अजून स्पष्ट झालेले नाही. या पार्श्वभूमीवर नुकताच समोर आलेला एक ऑडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या ऑडीओमध्ये एक महिला प्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी प्रत्यक्षात एलियन्स किंवा परग्रहवासी आणि उडती तबकडी पाहिल्याचा दावा करते आहे. डॉ.शर्ली नावाची ही महिला आईन्स्टाईनची सहाय्यक होती. मिळालेल्या माहितीनुसार हा ऑडीओ १९९३ मध्ये रेकॉर्ड केलेला आहे.
या ऑडीओमध्ये डॉ. शर्ली सांगतात, अमेरिकेकडून आईन्स्टाईन आणि अन्य काही वैद्यानिकांना १९४७ च्या जुलै महिन्यात बोलावणे आले होते तेव्हा शर्ली आईन्स्टाईन यांच्या सोबत अमेरिकेला गेल्या होत्या. ब्रिटन, अमेरिका आणि न्यू मेक्सिको असा हा प्रवास होता. त्यावेळी एक टॉप सिक्रेट एजंट त्यांना घेऊन एका स्थळी गेला. तेथे क्रॅश झालेले एक विमान म्हणजे उडती तबकडी आहे का आणि त्या जागी सापडलेले पाच विचित्र मृतदेह परग्रहवासी आहेत का हे आईन्स्टाईन यांनी सांगायचे होते. एक एअरबेसवर या संदर्भात एक अतिशय तातडीची परिषद त्यासाठी घेतली गेली होती आणि आईन्स्टाईन यांच्याबरोबर अनेक अन्य वैज्ञानिक सुद्धा तेथे आले होते.
डॉ. शर्ली सांगतात, अपघातग्रस्त झालेली वस्तू विमानासारखी होती पण ती एखाद्या डिस्क प्रमाणे अगदी पातळ होती. दुरून ती चमकत होती पण जवळ जाऊन पाहिल्यावर ती धुसर दिसत होती. तेथेच पाच मृतदेह पडलेले होते. साधारण ५ फुट उंचीचे, डोके मोठे, शरीर राखाडी रंगाचे आणि अंगावर अजिबात केस नसलेले आणि अतिशय घट्ट कपडे घातलेले असे हे मृतदेह होते. आईन्स्टाईन यांनी जवळ जाऊन त्याचे निरीक्षण केले पण डॉ.शर्ली याना मात्र दुरूनच ते पाहता आले होते.
शर्ली दावा करतात की एलियन्स अस्तित्वात आहेत याची आईन्स्टाईन यांना माहिती होती आणि त्यांना त्याबद्दल कधीच नवल वाटत नसे. भविष्यात मानव आणि एलियन्स यांच्यातील संवाद वाढेल असे आईन्स्टाईन यांचे म्हणणे होते. या ट्रीप नंतर आईन्स्टाईन यांनी आणखी एक ट्रीप केली होती त्यात त्यांनी जिवंत एलियन पहिला होता. मात्र या संदर्भात कुठेही वाच्यता करायची नाही अश्या सक्त सूचना सर्वाना होत्या. हा सारा प्रकार एकूण धक्कादायक होता असेही शर्ली यांचे म्हणणे आहे.