अन्य व्याधी असलेल्या मुलांना प्राधान्याने मिळणार कोविड लस

१७ वर्षाखालील मुलांना कोविड १९ लस देण्याचा कार्यक्रम लवकरच सुरु होत असून ज्या मुलांना अन्य काही व्याधी किंवा आजार आहेत त्यांना सर्वप्रथम लस दिली जाणार आहे आणि त्यानंतर बाकी मुलांचे लसीकरण केले जाणार आहे असे समजते. राष्ट्रीय लसीकरण तंत्रज्ञान सल्लागार समूहाचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा या संदर्भात माहिती देताना म्हणाले, १७ वर्षाखालील जी मुले हायरिस्क श्रेणीत म्हणजे त्यांना करोना झाला तर गंभीर आजारी होऊ शकतील किंवा रुग्णालयात दाखल करायची वेळ येऊ शकेल अश्याना प्रथम लस दिली जाईल. त्यासाठी यादी तयार केली जात असून दोन आठवड्यात प्राथमिक यादी तयार होण्याची अपेक्षा आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्याच आठवड्यात १२ वर्षांच्या वरील मुलांना तसेच वयस्क व्यक्तींना डीएनए आधारित आणि विना इजेक्शन दिल्या जाणाऱ्या झायडस कॅडीलाच्या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. सरकार आणि कंपनी याच्यात या संदर्भात चर्चा सुरु आहे. मुले करोनाची वाहक असू शकतात आणि त्याच्यापासून वयस्क व्यक्तींना संक्रमण होऊ शकते त्यामुळे सुरक्षा म्हणून लसीकरण करणे आवश्यक आहे असे डॉ. अरोरा यांनी सांगितले.

देशात १८ वर्षाखालील ४४ कोटी मुलांचे लसीकरण वेगाने केले जाणार असल्याचे सांगून डॉ.अरोरा म्हणाले सिरमची या वयोगटासाठीची कोवोवॅक्स लवकरच उपलब्ध होत आहे शिवाय आणखीही काही लसी येत आहेत. भारत बायोटेकच्या नाकातून देण्याच्या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये होणार आहेत. त्यामुळे तीन लसींचा पर्याय उपलब्ध होऊ शकणार आहे.