जगभरातील सर्व ठिकाणचे चॉकलेट होणार का नाहीसे?


या जगामध्ये चॉकलेट प्रेमींचा तुटवडा मुळीच नाही. प्रांत कोणताही असो, चॉकलेटचे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सेवन केले जात नाही असा प्रांत एकही आढळत नाही. प्रसंग कोणताही असो, भेट म्हणून दिलेली चॉकलेट आनंदाने स्वीकारली जातात, व चवीने खाल्ली, खाऊ घातली जातात. पण या जगातून काही वर्षांच्या अवधीत चॉकलेट नाहीसे होणार आहे, हे जर तुम्हाला सांगितले तर तुम्हाला आशर्य वाटेल. असे म्हटले जात आहे, की २०५० सालापर्यंत या जगातून चॉकलेट अगदी दिसेनासे होऊन जाणार आहे. असे घडण्यामागे ग्लोबल वॉर्मिंग हे कारण असल्याचे जर म्हटले, तर तुम्हाला खरे वाटणार नाही. पण हे खरे आहे.

चॉकलेट तयार होते कोको बीन्स पासून. ह्या कोको बीन्स् चे उत्पादन एका ठराविक क्षेत्रातच केले जाते. हे क्षेत्र भूमध्य रेखेच्या वीस अंश उत्तरेपासून ते वीस अंश दक्षिण या प्रदेशामध्ये विस्तारलेले आहे. या क्षेत्रामध्ये तापमानात कोणतेही विशेष चढ-उतार पाहायला मिळत नाहीत. या क्षेत्रामध्ये कोको बीन्स्चे उत्पादन केले जाते. पण मागील काही वर्षांपासून येथे ग्लोबल वॉर्मिंग मुळे तापमानामध्ये सतत चढ-उतार पाहण्यास मिळत आहेत. जिथे कोको बीन्स् चे उत्पादन केले जाते, त्या क्षेत्रामध्ये हे तापमानातील चढ-उतार जास्तच आढळून येत आहेत. या कारणाने येथील कोको बीन्स् चे उत्पादन दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहेत. आता तर हे उत्पादन इतक्या जलद गतीने घटत आहे, की २०५० सालापर्यंत चॉकलेट बनविण्यासाठी कोको बीन्स मिळणारच नाहीत अशी लक्षणे दिसत आहेत.

या समस्येमुळे चॉकलेट बनविणाऱ्या मोठ्या कंपन्यांपुढे संकट उभे राहिले आहे. या सर्व कंपन्या, इतर कंपन्यांच्या सह ग्लोबल वॉर्मिंग चा प्रभाव कमी करण्यासाठी कार्बन उत्सर्जन साठ टक्क्यांपर्यंत कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत. तसेच ग्लोबल वॉर्मिंगचा प्रभाव कमी करण्यासाठी आणखी कोणते व कसे प्रयत्न करता येतील या साठी निरनिराळ्या विद्यापीठांमध्ये संशोधने देखील सुरु आहेत.

Leave a Comment